आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाडी टाळा: हॉटेलमध्ये जेवण मिळणार ग्रॅममध्ये, जेवढे जेवाल तेवढ्याच अन्नाचे पैसे माेजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- हॉटेलमधील अन्नाची नासाडी टाळण्यासाठी केंद्र सरकार कठोर नियम बनवण्याच्या तयारीत आहे. यासाठी हॉटेलच्या मेनू कार्डमधील पदार्थासमोर त्याचे प्रमाणही लिहिले जाणार आहे. याशिवाय अन्य अनेक बाबींविषयी ग्राहक तसेच हॉटेल्सचे ग्राहक मंत्रालयाकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. 

केंद्रीय ग्राहक मंत्री रामविलास पासवान यांच्या मते, हा नियम लागू करण्यापूर्वी सर्व बाजू पडताळून पाहिल्या जातील. अन्नाची नासाडी रोखणे तसेच ग्राहकाला हवे तितकेच अन्न मिळावे आणि त्याने तेवढ्याचेच पैसे द्यावे, हाच या नियमामागील हेतू आहे. एका अधिकाऱ्याच्या मते, डोसा १५० ग्रॅमचा असावा की २०० ग्रॅम, हाफ प्लेट भाताची गरज असताना इच्छा नसूनही फुल प्लेट का घ्यायची, इडलीच्या प्लेटमध्ये किती इडली असाव्यात, अशा बाबी या नियमांतून हे निश्चित करावयाच्या आहेत. जर पदार्थांचे प्रमाणच कमी असेल तर निश्चितच त्याची किंमतही कमी असणार. एखाद्याला जास्त अन्न हवे असेल तर तो एकाच्या जागी दोन प्लेटही मागवू शकतो.

गुणवत्ता, पौष्टिकताही महत्त्वाची...
केवळ प्रमाणाच्या आधारे नियम बनवता येत नाही. प्रमाण ठरवताना भोजनाची गुणवत्ता आणि पौष्टिकता दोन्ही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. प्रमाण कमी-अधिक केल्याने प्रतिकूल परिणाम होऊ शकते. ग्राहकांकडून होणारी अन्ननासाडी थांबवणे गरजेचे आहे.  
- अमिताभ देवेंद्र, महासचिव, द फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टारंट असोसिएशन ऑफ इंडिया

सरकारसोबत चर्चेनंतरच स्पष्ट होणार...
यावर अंमलबजावणी कशी केली जाणार हा प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्तीचा आहार वेगळा असतो. सरकारची इच्छा नेमकी काय आहे? हे समजले नाही. पण हॉटेल-रेस्टारंटमधील शिल्लक अन्न गरजूंना देता येऊ शकते.   
- सईद एम. शेरवानी, सचिव, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स इन इंडियन टुरिझम.

मुलाखत: रामविलास पासवान
 
प्रश्न : नेमकी योजना काय? ही कल्पना कशी सुचली?  
- पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये हा उल्लेख केला म्हणून आम्ही पावले उचलली. अन्न नासाडी थांबवण्यासोबतच नागरिकांच्या हितांचे रक्षण हे धोरण आहे.  
प्रश्न : प्रत्येकाचा अाहार वेगळा, प्रमाण कसे ठरणार?  
- सामान्यपणे प्रत्येकाचा आहार जवळपास सारखाच असतो. कुणी भात खातो, कुणी पोळी. आहारतज्ज्ञांशी चर्चा करून आराखडा करून त्यातून पदार्थाचे प्रमाण ठरवले जाईल. एखाद्याला जास्त हवे असेल तर एकापेक्षा जास्त प्लेट मागवू शकतो.  
प्रश्न : मोठ्या हॉटेलमध्ये हाफ प्लेटसाठीही फुल प्लेटची किंमत द्यावी लागेल?  
हाफ प्लेटची किंमत फुल प्लेटपेक्षा कमी असायला हवी. याबाबत तोडगा काढला जाईल.  
प्रश्न : ढाब्यांसाठीही हाच नियम लागू असेल काय?  
ढाब्यांवर आधीपासूनच हाफ प्लेट, कटिंग भाजी सिस्टिम आहे. ही व्यवस्था तारांकित हॉटेल, मोठ्या रेस्टारंटसाठी असेल.  
प्रश्न : योजना लागू करण्यासाठी काही प्रोत्साहन देणार काय?  
नक्कीच देऊ. अन्न नासाडी थांबवण्यात योगदान देण्यासाठी हे करावेच लागेल.  हॉटेल मालकांनी प्रयत्न केल्यास ग्राहकांमध्ये लोकप्रियता वाढेल. याशिवाय आम्हीही प्रोत्साहनासाठी योजना आणू.

एका वेळच्या जेवणाचे प्रमाण निश्चित  
आहारतज्ज्ञ नीतू झा यांच्या मते, एका दिवसात एका पुरुषाला २ हजार आणि महिलेला १५००-१८०० कॅलरीची गरज असते. म्हणजेच एका व्यक्तीला एक वेळच्या भोजनात ७५ ग्रॅमच्या तीन पोळ्या, ३० ग्रॅम वरण, ३५ ग्रॅम भाजी, २५ ग्रॅम सॅलड आणि ५० ग्रॅम दही पुरेसे आहे. बहुतांश हॉटेल किंवा रेस्टारंटमध्ये दिले जाणारे भोजन एका व्यक्तीच्या दृष्टीने खूप जास्त असते. 
बातम्या आणखी आहेत...