आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडिकलसाठी देशभर एकच प्रवेश चाचणी? सुप्रीम काेर्टाने २०१३ चा निकाल घेतला मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील वैद्यकीय महाविद्यालयांत एमबीबीएस, बीडीएस आणि पीजी कोर्सेससाठी सिंगल कॉमन एंट्रन्स टेस्ट (नीट) पुन्हा सुरू होऊ शकते. २०१३ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने एका वादग्रस्त निकालात त्यासाठी जारी अधिसूचना रद्द केली होती. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सोमवारी हा निकाल मागे घेतला. यामुळे ‘नीट’ पुन्हा सुरू करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

१८ जुलै २०१३ राेजी तत्कालीन सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांच्या न्यायपीठाने ‘नीट’ रद्द केली होती. यामुळे खासगी महाविद्यालयांना अापली स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्याची मुभा मिळाली होती. तेव्हाच्या न्यायपीठात असलेले न्यायमूर्ती (आता निवृत्त) विक्रमजित सेन यांनी कबीर यांच्या निर्णयाला सहमती दिली होती. मात्र तिसरे न्यायमूर्ती ए.आर. दवे यांनी विरोध केला होता. या निकालाला मेडिकल काैन्सिल ऑफ इंडियाने आव्हान दिले होते.
आता न्यायमूर्ती ए.आर. दवे हेच पाच सदस्यीय घटनापीठाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या न्यायपीठाने सोमवारी सांगितले की, आम्हाला आढळले की, १८ जुलै २०१३ ला न्यायपीठाने निकाल सुनावण्याआधी चर्चा केली नव्हती. यामुळे आम्ही फेरविचार याचिका स्वीकारत आहोत. प्रकरणावर नव्याने सुनावणी होईल.

यंदा ‘नीट’ अवघडच
>यंदाच ‘नीट’ परीक्षा घेणे मुश्कील आहे. सरकारी आणि खासगी महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया आधीच निश्चित झाली आहे. पुढील वर्षापासून ती लागू करता येऊ शकते.
>सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’ परीक्षा घेण्याची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. म्हणजेच आता त्याच अधिसूचनेच्या आधारे ‘नीट’द्वारे प्रवेश देता येतील.
>घटनापीठाने फेरविचार याचिका दाखल करून घेतली आहे. आता सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नवीन न्यायपीठ तयार करतील.