आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - विदेशी विमानतळांवर शीखधर्मीयांची पगडी उतरवली जाऊ नये यासाठी भारताने अनेक पाश्चिमात्य देशांशी चर्चा केली. यामध्ये इटली, अमेरिका, इंग्लंड तसेच रोमानिया आदी देशांचा समावेश आहे.
विमानतळांवर चौकशी करतेवेळी धार्मिक भावनांना ठेच पोहोचू नये याची दक्षता घ्यावी, अशी विनंती या देशांना करण्यात आल्याची माहिती विदेश राज्यमंत्री ई. अहमद यांनी दिली आहे. देशातील शीख संघटनांनी केलेल्या विनंतीवरूनच ही पावले उचलण्यात आली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. विदेशातील विमानतळांवर चौकशी करतेवेळी सुरक्षा अधिकारी शिखांची पगडी उतरवून कसून चौकशी करतात. जगातील अव्वल दर्जाच्या विमानतळांवर अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. वास्तविक, विमानतळांवर फुल बॉडी स्कॅनिंग मशीन उपलब्ध असतात. त्यात कोणत्याही प्रकारचे कपडे किंवा जाड कव्हरखाली लपवलेली वस्तू स्पष्टपणे दिसते. तरीसुद्धा पगडी उतरवून त्यांची चौकशी करणे अर्थातच धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार असू शकतो, असे मत शीखधर्मीयांच्या काही संघटनांनी व्यक्त केले होते.
विदेशात घडलेली प्रकरणे
* मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात दिल्ली शीख प्रबंधन गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष मनजितसिंह आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांची इटलीच्या रोम विमानतळावर पगडी काढण्यात आली होती.
* पंजाब विधानसभेचे अध्यक्ष डॉ. चरणजितसिंह अटवाल यांची शिकागोच्या विमानतळावर कसून चौकशी करण्यात आली होती. त्यांना पगडी उतरवण्यास सांगण्यात आले, परंतु त्यांनी त्यास नकार दिला.
* संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी हरदीप पुरी यांना अतिरिक्त चौकशीच्या नावाखाली टेक्सासच्या विमानतळावर अर्धा तास अडवून धरण्यात आले होते. सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या पगडीची चौकशी करण्याची इच्छा व्यक्त केली.मात्र, पुरी यांनी त्यास नकार दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.