नवी दिल्ली- ललित मोदी प्रकरण, व्यापमं घोटाळ्यावर मंत्र्यांच्या राजीनाम्यांवर ठाम असलेले विरोधक आणि सत्ताधारी भाजप यांच्यातील संघर्ष शुक्रवारीही कायम होता. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पाण्यात गेला. लोकसभा आणि राज्यसभेचे पुढील कामकाज आता सोमवारी सुरू होणार आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, व्यापमं घोटाळ्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत तोपर्यंत कामकाज सुरळीत होणार नाही, असे काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभा आणि राज्यसभेत स्पष्ट केले. परंतु काँग्रेसची भूमिका अाडमुठेपणाची आहे. त्यामुळे सभागृहाचा अमूल्य वेळ वाया जात आहे, असे सांगत भाजपच्या सदस्यांनी काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही सभागृहात असेच गोंधळाचे चित्र पाहायला मिळत होते. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होऊन पाच मिनिटेही झाली नाहीत तोच सदस्यांनी घोषणाबाजी केली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. परंतु त्याला दाद मिळाली नाही. अखेर महाजन यांना कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. त्यामुळे साेमवारी कामकाजाला सुरुवात हाेईल.
२१ जुलैपासून गोंधळ
लोकसभा आणि राज्यसभेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून घोषणाबाजी, गदारोळ, स्थगिती हेच पाहायला मिळू लागले आहे. त्यामुळे कामकाज होऊ शकलेले नाही.
मुख्य द्वारावर भाजपची निदर्शने
सत्ताधारी भाजपने शुक्रवारी सकाळी संसदेच्या मुख्य द्वारावर निदर्शने केली. काँग्रेसच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे भाजप खासदारांनी सांगितले. जनता दल संयुक्तचे शरद यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी सभागृहात या कृतीवर आश्चर्य व्यक्त केले. सरकारमध्ये असून ही कृती शाेभणारी नाही, असे ते म्हणाले.
अगोदर राजीनामे घ्या, नंतरच संसद चालवू देऊ : राहुल गांधी
अनंतपूर (आंध्र प्रदेश) । पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मौन ’ सोडण्यास तयार नाहीत. त्यांनी अगोदर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत. त्यानंतरच संसदेचे कामकाज सुरळीत होईल, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भूसंपादनाच्या एनडीएच्या धोरणावरही राहुल यांनी टीकास्त्र सिडले. शेतकऱ्यांची एक इंचभर जमीनही सरकारला घेऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. नfवडणूक प्रचाराच्या काळात मोदी यांनी जनतेला ‘खाणार नाही, खाऊ देणार नाही’, असे म्हटले होते.