आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मित्र बिचकले, पण दुर्गाने पकडून दिली टारगट मुले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली / नोएडा / लखनऊ / चंदिगड - 28 जानेवारी 2010. स्थळ : कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली. सायंकाळी ती आपल्या मित्रांबरोबर फिरायला निघाली होती. अचानक तिने पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला. मित्र घाबरले. नेमके काय घडले? हे त्यांना माहीत नव्हते. काही बाइकस्वार मुलांनी तीन मुलींना रस्त्यात अडवले आहे. पोलिस येतील तेव्हा येतील. जा आणि त्यांना पकडा, असे तिने सांगितले. मित्र बिचकले. ती स्वत:च बाइकस्वारांच्या दिशेने झेपावली. त्यामुळे मित्रांनाही जोर चढला. त्यांनी त्या मुलांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ती मुलगी होती दुर्गाशक्ती नागपाल. तेव्हा ती आयएएसची प्रशिणार्थी होती.

त्याच मित्रांपैकी एकाने हा किस्सा सांगितला. पोलिसांनी एफआयआर नोंदवायला सांगितले होते. आम्हाला झेंगट मागे लावून घ्यायचे नव्हते. त्यामुळे आम्ही नकार दिला. मात्र दुर्गा पुढे आली. आम्ही तिला लाख समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिस केस झाल्यावर अनेकदा पोलिस ठाणे आणि न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार होत्या. प्रशिक्षण कालावधीत ते शक्य होणार नव्हते. तेव्हा कुठे दुर्गा मागे हटली.

अन्याय आणि बेकायदेशीर कामे खपवून घेणे दुर्गाच्या रक्तातच नाही, असे तिचे आप्तस्वकीय सांगतात. तिचे आजोबा दिल्ली पोलिसात होते. सदर बाजार परिसरात दरोडेखोरांशी लढताना ते शहीद झाले होते. वडील एस. नागपाल भारतीय सांख्यिकी सेवेत होते. डिफेंन्स स्टेट सर्व्हिसमध्ये काम करताना उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. निवृत्तीनंतर ग्रेटर नोएडातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात ते सल्लागारपदी रुजू झाले. त्याच महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये कामगारांच्या पाल्यांसाठी एनआयआयटी रेन्बो नावाने एक शाळा सुरू केली. दुर्गाची आईही या शाळेत नियमित शिकवत असे. आयएएस होण्याआधी दुर्गा सुट्यांमध्ये न चुकता मुलांना शिकवायला येई, असे या शाळेच्या शिक्षिका सीमा सांगतात.

दुर्गाच्या एकुलत्या एक भावाचा बालपणीच मृत्यू झाला. त्यावेळी दुर्गा आयएएसची तयारी करत होती. त्यामुळेच ती प्रचंड भावुक आहे. प्रशिक्षण सुरू असताना जेव्हा ती बाहेर फिरायला निघायची तेव्हा चित्रपट बघण्याचा हट्ट धरायची. एकच चित्रपट- थ्री इडियट्स. चित्रपटात राजू रस्तोगी या पात्राने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारल्याचा प्रसंग येताच प्रत्येकवेळी रडायची. आईवडिलांना मुलांची खूप आस असते. ती तुटली तर त्यांनाच तोडून टाकते, असे विचारल्यानंतर सांगायची, असे दुर्गाचे एक सहकारी आयएएस अधिकारी सांगतात.

साध्या सरळ दुर्गाला केवळ फक्त अभ्यासाचा छंद होता. सुरुवातीला प्रशिक्षणाकडे कोणी फारसे गांभीर्याने पाहत नाही. मात्र, दुर्गाने पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक पैलू गांभीर्याने घेतला. हीच बाब इतरांपेक्षा तिचे वेगळेपण सिद्ध करणारी होती. प्रशिक्षणादरम्यान ग्रामीण जीवन जवळून पाहण्यासाठी खेड्यात नेले जाते. दुर्गा वगळता कुणालाही त्यात फारसा रस नव्हता, असे राजस्थानचे एक आयएएस अधिकारी सांगतात.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दुर्गांना पंजाब केडर मिळाले. जून 2011 मध्ये मोहालीत प्रशिक्षणार्थी सहआयुक्तपदी रुजू झाल्या. मोहालीत एक महिना त्या एसडीएमही होत्या. या काळात त्यांनी सोहाना गावातील सरकारी जमिनीवरील बेकायदेशीर ताबे हटवले आणि रजिस्ट्रार कार्यालयातील स्टॅम्प घोटाळा उघडकीस आणला.

प्रसिद्धीपासून त्या नेहमीच अलिप्त राहिल्या. नोएडातील अवैध उत्खनन उघडकीस आणल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आणि सबंध देशभरातील मीडियाचे लक्ष वेधले. निलंबनाच्या दुसर्‍याच दिवशी सरकारी निवासस्थानाला त्यांनी कुलूप ठोकले. मोबाइल बंद केला. आतापर्यंत मीडियाशी चकार शब्दही बोलल्या नाहीत. आपली बाजूही मांडली नाही. दुर्गाच्या व्यक्तिमत्त्वात आम्हाला नोकरशाही कधीच दिसली नाही, असे त्या राहत असलेल्या ग्रेटर नोएडातील डब्ल्यूएचओ सोसायटीतील रहिवासी सांगतात.