आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेरगिरी प्रकरणाने संसदेत गदारोळ, जेपीसीची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांच्या हेरगिरीच्या बातम्यांवरून बुधवारी संसदेत जोरदार गदारोळ झाला. लोकसभेत काँग्रेसने हेरगिरी प्रकरणाचा संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) तपास करण्याची मागणी केली. त्याचबरोबर गुजरातच्या फोन टॅपिंगशी हे प्रकरण जोडण्याचाही प्रयत्न केला. राज्यसभेत चार वेळा कामकाज तहकूब करावे लागले.
लोकसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी हेरगिरीचा संबंध गुजरातच्या फोन टॅपिंगशी जोडला. पंतप्रधानांच्या राज्यात अर्थात गुजरातमध्ये 29 हजार नागरिकांचे फोन टॅपिंग झाले होते, असे खरगे म्हणाले. त्यावर गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले, ही बातमी निराधार आहे. म्हणूनच त्याचा तपास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संसदेच्या बाहेर मीडियाशी बोलताना राजनाथ यांनी आपल्या घरात झालेल्या हेरगिरीचा दावाही फेटाळून लावला. दुसरीकडे राज्यसभेत काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा म्हणाले, सरकार मोठ्या प्रमाणात फोन टॅपिंग करत आहे. हा प्रश्न गोपनीयतेचा आहे. हेरगिरीसाठी कोणाकडून परवानगी मिळाली होती, त्याची सखोल चौकशी व्हायला हवी.

अमेरिकेकडून 8 भाजप नेत्यांची हेरगिरी : स्वामी
गडकरी यांच्या निवासस्थानी हेरगिरी झाली होती, या दाव्यावर भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी मात्र ठाम आहेत. स्वामी यांनी पुन्हा नवा दावा केला आहे. त्यांच्या मते अमेरिकेने भाजपच्या आठ नेत्यांची हेरगिरी केली आहे. त्यामुळे सरकारने श्वेतपत्रिका जारी केली पाहिजे. त्यातून यूपीए सरकार आणि अमेरिका यांच्यात कसे साटेलोटे होते हेदेखील उजेडात येईल, असे स्वामी एका टीव्ही वाहिनीशी बोलताना म्हणाले.

स्वामींनाच विचारा-गडकरी
स्वामी हेरगिरीचा दावा करत आहेत. म्हणून काही प्रश्न असतील तर ते स्वामींनाच विचारावेत, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. हेरगिरी करणारी उपकरणे अगोदर माझ्या दिल्लीतील निवासस्थानी मिळाल्याचा दावा करणार्‍या मीडियाने नंतर मुंबईमधील निवासस्थानी हे साहित्य मिळाल्याने तेथेच हेरगिरी झाल्याचे म्हटले होते. म्हणूनच हा दावा खरा नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यांनी याअगोदर दोन वेळा ट्विट करून हा दावा फेटाळून लावला होता.