आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Game With Health : Drugs Marketing Code System Ignored Government

खेळ आरोग्याशी: औषधी विपणन सांकेतिकरण प्रणाली सरकारने बांधली बासनात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - औषधी विपणन संहिता (ड्रग मार्केटिंग कोड प्रणाली) लागू करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. बड्या औषध कंपन्यांच्या दबावामुळे औषधी विभागाने ही प्रणाली लागू करण्याचा प्रस्तावच बासनात गुंडाळला आहे. त्यामुळे डॉक्टर आणि औषध कंपन्यांच्या कथित ‘मैत्रीपूर्ण संबंधां’ वर अंकुश लावला जाण्याची शक्यता मावळली आहे.
सूत्रांनी सांगितले की, ड्रग मार्केटिंग कोड प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव तूर्तास सरकारच्या फार्मास्युटिकल विभागाच्या अजेंड्यावर नाही. ड्रग मार्केटिंग कोड अनिवार्यरीत्या लागू करण्यासाठी तशी तरतूद कायद्यात करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारला नवा अधिनियम लागू करावा लागेल किंवा सध्याच्या ड्रग अँड कॉस्मेटिक अ‍ॅक्टमध्ये तशी दुरुस्ती करावी लागेल, परंतु औषध कंपन्यांच्या दबावामुळे फार्मास्युटिकल विभाग इतके मोठे पाऊल उचलण्यास तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर आणि कंपन्यांच्या संबंधांवर निगराणी ठेवण्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा उपलब्ध नाही. औषध कंपन्या अनिवार्य ड्रग मार्केटिंग कोड प्रणालीचा वापर करत आहेत किंवा नाही हे तपासणारी यंत्रणा सध्या अस्तित्वात नाही. या नियमावलीचे उल्लंघन करणा-या कंपन्यांवर नेमकी काय कारवाई करायची याचेही सुस्पष्ट निर्देश नसल्याने त्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे याच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत.


नियोजन आयोगाने देशात डॉक्टर आणि औषध कंपन्यांच्या अनैतिक युतीवर अंकुश लावण्यासाठी अनिवार्य ड्रग मार्केटिंग कोड आणण्याचा प्रस्ताव मांडला होता. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राष्‍ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली होती. फार्मास्युटिकल विभागाने 2011 मध्ये ड्रग मार्केटिंग कोडचा मसुदा जारी केला होता. त्या वेळी असे सांगण्यात आले होते की, सुरुवातीचे सहा महिने ड्रग मार्केटिंग कोडचे पालन ऐच्छिक असेल, परंतु त्यानंतर सरकार ते अनिवार्य करू शकते. याची कुणकुण लागल्यानंतर औषध कंपन्यांनी सरकारवर दबाव वाढवला.


त्यांच्या दबावामुळे यासंदर्भातील अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही. ड्रग मार्केटिंग कोड प्रणालीअंतर्गत कंपन्यांकडून डॉक्टरांना देण्यात येणा-या कुठल्याही भेट प्रकार किंवा अन्य मार्गांनी पोहोचवल्या जाणा-या लाभावर बंदी घालण्यात आली आहे. याअंतर्गत औषध कंपन्या डॉक्टर किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी विदेश दौरा किंवा ऐषारामी जीवन, सुविधा देऊ शकणार नाहीत अथवा प्रायोजित करू शकणार नाहीत.


विभागाचा युक्तिवाद
नियमावली काय सांगते?

* औषध कंपन्या डॉक्टरांना कोणत्याही प्रकारचा लाभ देऊ शकणार नाहीत.
* डॉक्टर किंवा त्यांच्या कुटुंबीयांसाठी कंपन्या विदेश प्रवास किंवा
ऐषोरामी सुविधा प्रायोजित करू शकणार नाहीत.


विभागाची अडचण
* ड्रग मार्केटिंग कोड प्रणाली लागू करण्यासाठी अनिवार्य करण्यासाठी कायद्याची गरज
* त्यासाठी सरकारला नवा कायदा आणावा लागेल किंवा
सध्याच्या कायद्यात तशी दुरुस्ती करावी लागेल
* परंतु इतकी मोठी जबाबदारी घेण्याची फार्मास्युटिकल विभागाची तूर्तास तयारी नाही.
* फार्मास्युटिकल विभागाकडे औषध कंपन्यांवर लक्ष ठेवू शकणारी मशीनरी किंवा यंत्रणा नाही.
* नियमाचे उल्लंघन करणा-या कंपन्यांवर करण्याच्या कारवाईबाबत स्पष्ट संकेत नसल्यामुळे यंत्रणेत संभ्रम .