आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्‍यावधी सार्वत्रिक निवडणुका गृहीत धरून भाजपची ब्ल्यू प्रिंट होणार तयार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मध्यावधी सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता गृहीत धरूनच भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीची ब्ल्यूप्रिंट तयार करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला भ्रष्टाचार, महागाई आणि अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यांवर लक्ष्य करून संघटितपणे सुशासन आणि विकासाच्या मुद्द्यांवर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निश्चय या बैठकीत करण्यात आला.


गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत झालेली भाजपच्या संसदीय मंडळाची चार दिवसांतील दुसरी बैठक आहे. या बैठकीत सार्वत्रिक निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. घटक पक्षांच्या दबावापुढे यूपीएची शकले होत असून काँग्रेसनेही मध्यावधीला सामोरे जावे, असे आव्हान भाजपचे सरचिटणीस अनंतकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
दोन तास चाललेल्या या बैठकीत आगामी काही महिन्यांत देशभरात 100 सभा घेण्यापासून ते प्रचार साहित्याची तयारी, जाहीरनामा आणि मतदान केंद्रस्तरावर पोहोचण्याची रणनीती आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.


मोदी प्रचार समितीचे प्रमुख, पण सर्वाधिकार नाहीत
नरेंद्र मोदी यांच्यावर भाजपच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली असली तरी त्यांना सर्वाधिकार प्रदान करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह आणि अन्य ज्येष्ठ भाजप नेत्यांशी समन्वय राखून त्यांना काम करावे लागत आहे. निवडणुकीशी संबंधित सर्व निर्णय संसदीय मंडळातच घेतले जात आहेत. या मंडळात अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आणि सुषमा स्वराज यांचा समावेश आहे. हे नेते अद्याप तरी मोदींच्या गोटात नाहीत.


मोदींच्या गळ्यात राजनाथांचे ‘लोढणे’
निवडणुकीशी संबंधित समित्या स्थापन करण्याचे अधिकार संसदीय मंडळाने राजनाथ सिंह आणि मोदी यांना बहाल केले आहेत. समितीची रचना ते दोघेच ठरवतील आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून त्यांना अंतिम स्वरूप देतील, असे अनंत कुमार यांनी सांगितले.


निवडणुकीसाठी दुहेरी रणनीती
निवडणुकीसाठी दुहेरी रणनीती आखली आहे. प्रचार मोहिमेतून जनाधार मिळवण्यासाठी सभा, कार्यक्रमांच्या माध्यमांतून विविध समुदायांपर्यंत जाण्याचा मानस आहे, तर संघटनात्मक पातळीवर बूथस्तरावर पोहोचण्याच्या रणनीतीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.