आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Germany Gets To Know About 'Make In India', Ahead Of PM Modi's Visit

जर्मनीच्या दौर्‍यात मोदी यांचे गुंतवणुकीला असेल प्राधान्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जर्मनीच्या दौर्‍याला रविवारपासून सुरुवात होणार आहे. जर्मनीतील नेत्यांबरोबरच ते आघाडीच्या उद्योजकांशी चर्चा करतील. त्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करण्याचाही त्यांचा प्रयत्न असेल.

रविवारपासून मोदी युरोपच्या दौर्‍यावर असतील. या दौर्‍यात त्यांचा मेक इन इंडिया घोषणेला साजेसा भेटींचा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. जर्मन चान्सलर अँगेला मर्केल यांची भेट घेतील. त्याचबरोबर उद्योजकांच्या एका संमेलनाचे उद््घाटनही त्यांच्या हस्ते होईल. संमेलनात ३५० भारतीय उद्योजक सहभागी होतील. जानेवारीत व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने जगभरातील उद्योजक भारतात जमले होते. आता तीन महिन्यांनंतर हॅनोव्हर मेसिच्या निमित्ताने भारतातील उद्योजक जर्मनीत दाखल होणार आहेत, असे राजदूत मायकल स्टिनर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, मोदी यांच्यासमवेत केंद्रीय मंत्रिमंडळातील पाच जणांचे शिष्टमंडळही असेल. त्यात निर्मला सीतारमण, पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद, राजीव प्रताप रुडी आणि एम. वेंकय्या नायडू यांचा समावेश असेल. त्याशिवाय मेघालय, उत्तर प्रदेश, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि ११० उद्योजकही असतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अगोदर आशियातील अनेक देशांचा दौरा करून भारतात गुंतवणुकीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचेही दिसून आले आहे.

ऑक्टोबरमध्ये मर्केल भारत भेटीवर
मोदी यांचा जर्मनी दौरा उभय देशांतील संबंधांना ‘नव्या उंचीवर’ नेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच मर्केलदेखील ऑक्टोबरमध्ये भारत दौर्‍यावर येतील.

तीनदिवसीय दौरा
मोदी यांचा जर्मनीचा हा तीनदिवसीय दौरा आहे. दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी भारत-जर्मन उद्योजक संमेलनात मोदी सुमारे ८०० उद्योजकांशी चर्चा करतील. काही उद्योगांच्या सीईओंसोबत ते वैयक्तिक पातळीवरदेखील चर्चा करण्याची शक्यता आहे.

सौर प्रकल्पांचा करार
भारत-जर्मनीत सौर प्रकल्पासंबंधी करार होऊ शकतो. त्यासाठी भारतातील काही शहरांशी समझोता होईल.