आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Germany Intersted To Invest In Delhi mumbai Corridor Project

दिल्ली- मुंबई कॉरिडॉरमध्ये गुंतवणुकीस जर्मनी उत्सुक, औरंगाबादलाही होणार फायदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन- अत्यंत महत्त्वाकांक्षी 90 अब्ज डॉलरच्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये (डीएमआयसी) गुंतवणूक करण्यास जर्मनी उत्सुक आहे. भारतीय शिष्टमंडळाने कॉरिडॉरमध्ये गुंतवणुकीस पूरक उद्योगांसंबंधी केलेल्या विशेष सादरीकरणानंतर जर्मनीने यात रस दाखवला आहे.
मुळात जपानच्या आर्थिक सहकार्याने सुरू झालेल्या या प्रकल्पात इतर देशांनाही गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचे सादरीकरणात स्पष्ट करण्यात आले. याला जर्मनीतून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या जर्मनी भेटीदरम्यान तीन दिवस भारतात औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीच्या या नव्या संधीचा प्रभाव जाणवत होता.
सादरीकरण कशाला? : युरोपीय संघातील 27 देशांपैकी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून जर्मनीची ओळख आहे. या देशातून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हे सादरीकरण करण्यात आले.
डीएमआयसीमध्ये आहे काय?- दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर उद्योगांना सुविधा देण्याचा यात उद्देश आहे. या माध्यमातून देशात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक येईल व रोजगार वाढेल.
औरंगाबादेत येऊ शकतात हे उद्योग - औरंगाबादेत सध्या जर्मनीच्या सीमेन्स कंपनीचा मोठा प्रकल्प आहे. औरंगाबादची ऑटोमोबाइल हब अशी जगभर ओळख असल्याने डीएमआयसीमध्ये जर्मन ऑटोमोबाईल कंपन्या, वाहन निर्मितीसाठी लागणार्‍या पूरक उद्योगांमध्ये सहभागी होऊ शकतात.
मद्य व औषध निर्मिती क्षेत्रातही जर्मन कंपन्या गुंतवणूक करू शकतात. गेल्या महिन्यात झेक प्रजासत्ताकाने डीएमआयसीत आपल्या देशातील कंपन्यांना चांगली संधी असल्याचे सांगत गुंतवणुकीचे संकेत दिले होते.
युरोपातील मंदीच्या वातावरणात भारतात गुंतवणूक आणि उद्योगाला चांगला वाव असल्याने जर्मनीतील उद्योग डीएमआयसीला प्राधान्य देऊ शकतात. आगामी काळात या संदर्भातील घडामोडींना वेग येणार आहे.
थोडक्यात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)
- 7 राज्यांतून जाणार कॉरिडॉर
- 1,483 किमी अंतरांचा बेल्ट
- जपानची या प्रकल्पावर 4.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक
- केंद्र सरकारकडून पायाभूत सुविधांसाठी 18,500 कोटी रुपयांची मंजुरी
- सात निर्मिती व गुंतवणूक विभाग
- शिवाय जागतिक दर्जाची उद्योगनगरी उभारण्याचा संकल्प