आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खांदेपालट: काँग्रेसमध्ये ‘सर्जरी’ सुरू, आझाद उत्तर प्रदेशचे प्रभारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काँग्रेसमध्ये खांदेपालटाची सुरुवात झाली असून ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, कमलनाथ यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याशिवाय आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आझाद उत्तर प्रदेशचे, तर कमलनाथ पंजाब-हरियाणाचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.

पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये पुढील वर्षीच्या सुरुवातीला निवडणूक होणार आहे. राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवली जातील, अशी चर्चा सुरू असतानाच काँग्रेसमधील संघटनात्मक फेरबदलाची ही घोषणा झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात पक्षाच्या आमदारांनी विरोधी गटाला मतदान केल्याचे स्पष्ट झाले होते. हरियाणातही १४ आमदारांचे मतदान रद्द ठरले होते. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांच्यासोबतच्या धुसफुसीचा हा फटका असल्याचे मानले जाते. त्यामुळे काँग्रेस आमदार पक्षाच्या विरोधात गेले. काँग्रेससाठी निराशाजनक असलेल्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सोनियांना हा निर्णय घ्यावा लागला. आझाद (६७) हे गांधी घराण्याचे निष्ठावंत अाहेत. ६९ वर्षीय कमलनाथ मध्य प्रदेशातील ज्येष्ठ नेत्यांपैकी असून छिंदवाडा मतदारसंघातून ते सलग नऊ
वेळा संसदेवर निवडून गेले आहेत. आझाद यांच्याकडे पूर्वीदेखील दोन वेळा उत्तर प्रदेशचे सरचिटणीसपद होते. कमलनाथ १५ वर्षांपूर्वी गुजरात व पश्चिम बंगालचे सरचिटणीस होते. आसाम, केरळसह चार राज्यांतील पीछेहाटीमुळे आता पक्षांतर्गत ‘सर्जरी’स सुरुवात झाली आहे.
आसाम, केरळसह चार राज्यांतील पीछेहाटीमुळे तातडीने बदलास सुरुवात
यूपीत अस्तित्व राखण्याचे आव्हान, व्यूहरचनेसाठी प्रशांत किशोर
काँग्रेसने उत्तर प्रदेश व हरियाणातील संघटनेला बळकटी आणण्यासाठी निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांची नेमणूक केली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या प्रचार मोहिमेची धुरा किशाेर यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. आता किशोर उत्तर प्रदेश व हरियाणातील काँग्रेस प्रदेश शाखांना व्यूहरचना तयार करून देतील. लोकसभेत काँग्रेसला उत्तर प्रदेशात केवळ दोन जागा राखता आल्या होत्या. त्यात पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (रायबरेली), राहुल गांधी (अमेठी) यांचा समावेश होता. १९८९ नंतर पहिल्यांदाच पक्षाचा असा सफाया झाला होता.

पंजाबमध्ये ९ वर्षांपासून काँग्रेस विरोधी बाकावर
पंजाबमध्ये गेल्या नऊ वर्षांपासून काँग्रेस विरोधी बाकावर आहे. शिराेमणी अकाली दल-भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. आम आदमी पार्टीही पंजाबमध्ये प्रयत्नशील आहे. त्यामुळे पंजाबमधील विधानसभा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...