नवी दिल्ली - तेच मैदान, तेच लोक आणि त्याच घोषणा. भारतमाता की जय, इन्किलाब झिंदाबाद आणि वंदे मातरम्. पण या वेळी आवाज सरकारचा होता. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आहेत आणि त्यांचे सहा साथीदार मंत्री. या वेळी केजरीवाल यांनी लाच देणार नाही आणि घेणारही नाही, अशी शपथ जनसमुदायाला घ्यायला लावली. शिवाय जनतेला एक मंत्रही दिला. भ्रष्टांना अडकवायचे तर लाच द्यायला नकार देऊ नका; पण आधी सापळा रचा. आम्ही पुढचे बघतो, असे ते म्हणाले.
केजरीवाल यांनी बरोबर 12 वाजता शपथ घेतली. 45 वर्षीय केजरीवाल दिल्लीचे सर्वात तरुण
मुख्यमंत्री ठरले आहेत. लाच न देण्याची, न घेण्याची शपथ त्यांनी मंचावरून जनसमुदायाला घ्यायला लावली. पुढच्या निवडणुकीसाठी तयार असल्याचे सांगून ते म्हणाले, ठरवले आहे तेच करू, मग भलेही 3 जानेवारीला बहुमत सिद्ध होवो अगर न होवो. मग एक गाणे गाऊन ते म्हणाले, ‘इन्सान से इन्सान का हो भाईचारा, यहीं पैगाम हमारा...!’ अर्धा तास चाललेल्या सोहळ्यानंतर केजरीवाल थेट मंत्रालयात गेले. मंत्र्यांना कामाचे वाटप केले. कॅबिनेटच्या दोन बैठकाही घेतल्या. दोन आदेशही काढले. राज्य सरकारचा कोणीही मंत्री, अधिकारी लाल दिवा वापरणार नाही आणि खास सुरक्षा घेतली जाणार नाही असे हे आदेश आहेत.
आम आदमी.. हवे त्याला डोक्यावर घेतो, तर नको त्याला जमिनीवर आदळतो. अरविंद केजरीवाल यांनी लोकांच्या मनात असे स्थान काबीज केले की वर्षभरातच लोकांनी त्यांना दिल्ली राज्याच्या सर्वोच्च् खुर्चीवर बसवले. त्यामुळेच सोशल मीडियाने ‘सीएम’ या शब्दाची नवी व्याख्या दिली आहे.... कॉमन मॅन!
दिवस 'आम'चा : सहा मुद्दे, भावनेला हात, राजकारणावर प्रहार
1. सरकार फक्त माझे नाही. दिल्लीच्या दीड कोटी जनतेचे आहे. हा विजय नियतीचा चमत्कार वाटतो. आमच्याकडे कोणती जादूची कांडी नाही.
2. अण्णा म्हणत राजकारण चिखल आहे. घाण लागेल. त्यावर चिखल साफ करायचा तर त्यात उतरावेच लागेल, असे मी त्यांना समजावायचो.
3. अधिका-यांपासून सावध राहावे लागेल, असे लोक सांगतात. माझ्या मते, सगळे भ्रष्ट नाहीत. काही अधिकारी देशाची सेवा करू इच्छितात.
4. हर्षवर्धन भले गृहस्थ आहेत. त्यांच्या पक्षाबाबत असे म्हणू शकत नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांना माझे आमच्यासोबत येण्याचे आवाहन आहे.
5. भारताला पुढच्या पाच वर्षात सोन्याचा धूर निघणारा देश होण्यास कोणी रोखू शकणार नाही. दिल्लीत आपचे सरकार ही सुरुवात आहे.
6. कोणी लाच मागितल्यास नाही म्हणू नका. त्याच्याशी सेटिंग करून घ्या. दोन दिवसांत एक नंबर देऊ. त्यावर कळवा. रंगेहाथ पकडू.
कामकाजासाठी हाती
फक्त 2 महिने
काँग्रेसचा पाठिंबा राहिला तरी केजरीवालांकडे मोकळेपणे कामासाठी दोन महिने आहेत. निवडणूक आयोग मार्चमध्ये केव्हाही लोकसभा निवडणूक जाहीर करू शकतो. मग कोणती घोषणा वा धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत.
सकाळी । मेट्रोतून निघाले
गर्दी इतकी की रेल्वेत पाय ठेवायलाही जागा उरली नाही
केजरीवाल आपल्या सहा मंत्री व नेत्यांसह सकाळी 10.30 वाजता मेट्रो रेल्वेतून शपथविधीसाठी निघाले. कौशंबी स्टेशनवर प्रचंड गर्दी जमली. क्षमतेपेक्षा चारपट अधिक लोक मेट्रो स्टेशनवर पोहोचले.
दुपारी । शपथ घेतली
रामलीला मैदानावर लाखभर लोक, एकही मोठा नेता नाही
12 वाजता पूर्ण टीम रामलीलावर दाखल झाली. सोहळ्यात एकाही बड्या नेत्यास निमंत्रण नव्हते. येथे एक लाख लोकांची गर्दी होती. भाजपचे हर्षवर्धन व इतर तीन आमदार वगळता एकही नेता नव्हता.
सायंकाळी । निर्णय सुरू
9 अधिका-यांच्या बदल्या, सुरक्षा नाकारली, लाल दिव्यावर बंदी
कॅबिनेटची बैठक घेतली. निर्णय झाला की, मंत्री लाल दिव्याच्या कारमध्ये जाणार नाहीत, जीवितास धोका असणा-यांनाच सुरक्षा मिळेल. पाणी विभागाच्या सीईओ आणि 9 अधिका-यांच्या बदल्या केल्या.
पोलिसाकडून घोषणा : पोलिसही हवे केजरीवालांच्या अखत्यारीत
केजरीवालांचे भाषण सुरू होते तेव्हा एक पोलिस पुढे आला. भ्रष्टाचार संपवण्यासाठी पोलिसही केजरीवालांच्या अखत्यारीत आणा, अशा घोषणा त्याने दिल्या. इतर पोलिसांनी त्याला तोंड दाबून मैदानाबाहेर काढले.
मोठा आरोप । काँग्रेस-आप ‘डील’ एका उद्योजकाने घडवली : गडकरी
भाजप नेते नितीन गडकरी ‘आप’वर आरोप करत म्हणाले, देशातील एका मोठ्या उद्योगपतीने दिल्लीत सरकार स्थापनेसाठी आप व काँग्रेसमध्ये सौदा घडवून आणला. दिल्लीतील हॉटेलमध्ये ही बैठक झाली. सौद्यादरम्यान उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनेच ही माहिती दिल्याचे ते म्हणाले.