नवी दिल्ली - महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे देशात विविध ठिकाणी पुतळे बसवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी अचाट मागणी हिंदू महासभेने केंद्र सरकारकडे केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी गोडसेला देशभक्त ठरवल्याने वाद उद्भवला होता. त्याचा धुरळा बसतो न बसतो तोच हिंदू महासभेने नवा वाद निर्माण केला आहे.
हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रप्रसाद कौशिक यांनी या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत सांगितले की, गोडसेने गांधी हत्येमागील जे कारण कोर्टात सांगितले होते ते सार्वजनिक केले जावे. आम्ही पुतळे बसवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सरकारकडे करत आहोत. नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्लीत महात्मा गांधी यांच्या छातीत अत्यंत जवळून तीन गोळ्या झाडत त्यांची हत्या केली होती.
… तर कार्यालयांत पुतळे बसवणार
सरकारने जागा उपलब्ध न करून दिल्यास आम्ही आमच्या जागेत गोडसेचे पुतळे बसवू. आमच्या हिंदू महासभेची अनेक राज्यांत कार्यालये आहेत. तेथे आम्ही गोडसेचे पुतळे उभारू. याबाबत सरकारला एक पत्रही लिहिले जाईल, असेही हिंदू महासभेने म्हटले आहे.