आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Rent Then Be Owner Of House, Hudco New Scheme

घरभाडे भरून व्हा मालक, हडकोची विशेष योजना तयार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशभरात भासणारा घरांचा तुटवडा पाहता, केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या हडको विभागाने एक विशेष योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत एका ठरावीक कालमर्यादेपर्यंत नागरिकांना घराचे भाडे भरावे लागेल, त्यानंतर त्या व्यक्तीला घराचा मालकीहक्क मिळेल. महाराष्‍ट्रासह मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांनी या योजनेत रस दाखवला आहे. ‘रेंट टू ओन’ असे या योजनेचे नाव आहे. या अंतर्गत काही ठिकाणी पुनर्निर्माण योजना राबवली जाणार असून, छोट्या बैठ्या घरांच्या जागेवर बहुमजली इमारती उभारण्याचे प्रस्तावित आहे.


येत्या 2/3 वर्षांत ही योजना देशभरात कार्यान्वित होण्याची आशा हडकोचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक व्ही.पी. बलिगर यांनी व्यक्त केली आहे. याअंतर्गत पोलिस कॉन्स्टेबल, बस वाहक-चालक, अशा मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांच्या गरजांनुसार घरे बांधली जाणार आहेत. ती पूर्ण झाल्यावर हे नागरिक तेथे राहण्यास जातील, ठरावीक काळासाठी भाडे भरतील व कालमर्यादा पूर्ण झाल्यावर घराचे मालक होतील. या योजनेचा लाभ लाभार्थींना ते नोकरी करत असलेल्या संस्थेच्या माध्यमातून घेता येईल. संस्थेने कर्मचा-याची हमी घेतल्यावरच योजनेचा लाभ घेता येईल. त्यानंतर कर्मचा-याच्या वेतनातून घरभाड्याची रक्कम थेट वळती केली जाईल. यासाठी संस्थेला जागेचा शोधही घ्यावा लागणार आहे. जेथे शहरात मध्यवर्ती भागात भूखंड उपलब्ध होणार नाही, तेथे शहराबाहेर जागेचा शोध घेतला जाईल, असे बलिगर यांनी सांगितले.


मुख्य सचिवांसोबत चर्चा
महाराष्‍ट्राचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्यासोबत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असून मध्य प्रदेश तसेच कर्नाटक या राज्यांनीही या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात रुची दाखवल्याचे बलिगर यांनी सांगितले. काही ठिकाणी ही योजना पुनर्निर्माणाच्या रूपाने राबवली जाणार आहे. या अंतर्गत एक किंवा दोनमजली घरे पाडून बहुमजली इमारती उभारल्या जाणार असल्याची माहिती बलिगर यांनी दिली.


आशियाई विकास बँकेचा कर्ज प्रस्ताव थंड्या बस्त्यात
आगामी काळात जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेसह (जेएनएनयूआरएम) नागरी आराखड्यातील अनेक विकास योजनांची गती मंदावण्याची शक्यता आहे. अशा योजनांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करणा-या हडकोने आशियाई विकास बँकेकडून 15 कोटी डॉलर कर्ज घेण्याचा प्रस्ताव सध्या थंड्या बस्त्यात टाकला आहे. हडकोचे मुख्य कार्यकारी संचालक व्ही. पी. बलिगर यांनी ही माहिती दिली. रुपयाचे अवमूल्यन हे या निर्णयाचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले. रुपया वधारताच ही कर्जप्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल असे ते म्हणाले. 25 कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड उभारण्याचाही हडकोचा प्रयत्न असून त्याअंतर्गत उद्योजकतेला प्रोत्साहन देणार असल्याचे बलिगर म्हणाले.