आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांच्या संशोधनवृत्तीला प्रोत्साहन द्या : पंतप्रधान मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील कामगारांच्या कौशल्य व संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देऊनच देशातील उद्योगांची प्रगती होऊ शकते, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. कंपन्यांनी त्यासाठी प्रोत्साहन देऊन कामगारांना उद्योजकतेचा मार्ग दाखवला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधानांनी या निमित्ताने केले.

केंद्रीय कामगार मंत्रालयातर्फे सोमवारी दिल्लीत ४६ व्या भारतीय श्रम संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय कामगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) बंडारू दत्तात्रय, कामगार व रोजगार मंत्रालयाचे सचिव शंकर अग्रवाल या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून कामगार विभागाचे मुख्य सचिव बलदेवसिंह, कामगार आयुक्त एच.के.जावळे आणि असंघटित कामगार विकास आयुक्त पंकज कुमार यांनी संमेलनात भाग घेतला.
पंतप्रधान म्हणाले, उद्योजकांनी आपल्या कामगारांच्या गुणांचा वापर करून त्यांना विकसित होण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. देशातील ५० वर्षे जुन्या उद्योगांची प्रगती, त्यात असलेले उत्तम वातावरण यांचा अभ्यास करून ते वर्तमान उद्योगांकडे घेऊन गेल्यास देशातील कामगार व उद्योगांचा विकास होण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरेल. कामगारांच्या यशकथा जोपर्यंत उद्योग गटापर्यंत जाणार नाहीत तोपर्यंत विकास अवघड आहे. कामगारांच्या हितासाठी कायद्याचीही गरज आहे, असे सांगून या विषयाकडे सामाजिक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. मालक-कामगार यांच्यात कौटुंबिक वातावरण तयार झाल्यास देशाचा विकास कोणी रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील कामगार असंघटित आहे. त्याला त्याचे हक्क, कायद्यांची कल्पना नसते. मोठे वकील देऊन तो त्यासाठी लढूही शकत नाही. कायद्यांचे सरळीकरण झाले तर त्याचा बराच त्रास कमी होऊ शकेल. सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे, असे मोदी म्हणाले.
सेवा लोकार्पण
देशात असलेल्या ९३ टक्के असंघटित कामगारांना आरोग्य, विमा, पेन्शन आदी सोयी नाहीत. केंद्र सरकारने यासाठी ३ महत्त्वाकांक्षी योजना आणल्या आहेत. कामगार संघटनांनी या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. या वेळी त्यांनी ‘राष्ट्रीय करिअर सेवा (NCS) पोर्टल’ आणि कामगार आरोग्य सेवाविषयक ‘ईएसआयसी २.० ’ सुधारणा देशाला समर्पित केल्या.
प्रशिक्षणाची दारे बंद करू नका
देशातील तरुण बेरोजगारांच्या संधी हिरावून घेण्याचा आम्हाला अधिकार नाही. त्यांना संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. देशातील उद्योगांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. चीनमधे २ कोटी तरुण, जपानमध्ये १ कोटी, जर्मनीमध्ये २० लाख, तर भारतात केवळ ३ लाख तरुण प्रशिक्षणांतर्गत विविध उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. कायद्यात अडकू या भीतीने उद्योगांनी तरुणांसाठी प्रशिक्षणाची दारे बंद केली आहेत. हे चित्र बदलून अधिकाधिक तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना सामावून घ्यावे लागेल, याकडेही माेदींनी लक्ष वेधले.
बातम्या आणखी आहेत...