आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Goa CM Manohar Parrikar May Become Next Union Defense Minister

देशाला मिळणार मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या रुपात नवा केंद्रीय संरक्षण मंत्री?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/पणजी- देशाला लवकरच संरक्षण मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार पाहणारा केंद्रीय मंत्री मिळणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गळ्यात केंद्रीय संरक्षण मंत्रिपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रिपदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी नव्या संरक्षण मंत्र्याची नियुक्त करुन जेटली यांच्या खांद्यावरील भार हलका करण्याच्या विचारात आहेत.

कुशल नेतृत्त्व आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या पर्रिकर यांना केंद्रीय संरक्षणमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. विशेष म्हणजे, पर्रिकर हे पंतप्रधान नरेंद्र यांचे निकटवर्तीयांपैकी एक आहेत. गत वर्षी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोष‍ित करण्यात मनोहर पर्रिकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
या पार्श्वभूमीवर पर्रिकर आज (बुधवार) सायंकाळी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांचे चिरंजीव जयंत सिन्हा, चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर, मुख्तार अब्बास नकवी आणि राजीव प्रताप रूडी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच काही राज्यमंत्र्यांना देखील कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात प्रकाश जावडेकर आरि निर्मला सीतारामन यांचा समावेश आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी हे येत्या सात नोव्हेंबरला दोन दिवसांच्या वाराणसी दौर्‍यावर जात आहेत. मोदी वाराणसीतूनच निवडणूक आले होते. नंतर दिल्लीत परतल्यानंतर 12 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे.