आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी होणार; लोकसभेसाठी पंकजा तर विधानसभेसाठी यशश्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय ग्रामविकासमंत्री व भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी होणार आहे. नितीन गडकरी व भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांची मंगळवारी सकाळी भेट घेतली. गृहमंत्र्यांनी त्यांची ही मागणी मान्य केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. गृहमंत्रालयाने तशी शिफारस सीबीआयकडे केली आहे.

मुंडे यांच्या अपघाती निधनानंतरच्या संशयकल्लोळातून सहीसलामत सुटणे, मराठवाड्यात टपून बसलेल्या राष्ट्रवादीला हुलकावणी देत मुंडे कुटुंबीयांचे पुनर्वसन करणे व कोट्यवधी बहुजनांच्या मनात भाजपबाबत आस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने फडणवीस यांनी सोमवारी रात्री दिल्ली गाठली. मुंडे यांच्या निधनानंतरच्या राज्यातील राजकीय स्थितीबद्दल गडकरींशी सविस्तर चर्चा केली. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने मुंडे यांच्या अपघाताच्या सीबीआय चौकशीची लोकांची मागणी मान्य करावी, अशी गळ घातली.

अस्थिकलशाचे उद्या विसर्जन : स्व. गोपीनाथ मुंडे यांचा दशक्रिया विधी गुरुवारी सकाळी दहानंतर पैठण येथील गोदावरीच्या कृष्ण कमल तीर्थ घाटावर होणार आहे.

लोकसभेसाठी पंकजा, विधानसभेसाठी यशश्री मुंडे
मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे यांना लोकसभेची बीडची जागा लढवण्यासाठी भाजपने राजी केले आहे. तर विधानसभेत मुंडे यांची दुसरी कन्या यशश्री यांना उतरवण्यावर विचार आहे. मुंडे केंद्रात मंत्री होते त्यामुळे पंकजा यांनाही तसे मंत्रिपद द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, पंकजा यांच्याशी नुकतीच चर्चा झाली. राज्यात पक्ष मुंडे यांच्यामुळेच भक्कम झाला. पंकजा केवळ मुंडे यांच्या कन्या म्हणून नव्हे, तर त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून राज्यात चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांच्यावर पक्ष ज्या-ज्या जबाबदार्‍या सोपवेल त्याला त्या न्याय देतील. केंद्रात असो किंवा महाराष्ट्रीात मुंडे कुटुंबीयांची दखल घेतली जाईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बहुजन जोडून ठेवण्याचा प्रयत्न
मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर तर्कवितर्कांना ऊत आला आहे. मुंडेंच्या अपघातामागे कट असावा, अशी शंकाही उपस्थित होत आहे. परळीला मुंडे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी लोकांना अंत्यदर्शन घेता न आल्याने दगडफेकही झाली होती. राज्यात विधानसभेची येऊ घातलेली निवडणूक पाहता बहुजनांची मतपेढी भाजपपासून दुरावण्याचा धोका फडणवीस यांनी राजनाथ यांच्या लक्षात आणून दिला. शेवटी सीबीआय चौकशी करण्याच्या मुद्द्यावर राजनाथ राजी झाले.
सीबीआयचा होकार
गृहमंत्रालयाने या प्रकरणात सीबीआय चौकशीची शिफारस केली असून त्याला सीबीआयनेही होकार दिला आहे. आता पंतप्रधान कार्यालयाअंतर्गत असलेला कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग सीबीआयला याबाबतीत एक औपचारिक पत्र पाठवेल. यानंतर दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या चौकशीची सूत्रे सीबीआय आपल्याकडे घेईल.

मुंडेंच्या वाहनाला धडक देणार्‍या 32 वर्षांच्या गुरविंदरसिंहविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.

लवकरच आदेश
भाजप नेते एकनाथ खडसे यांनी मुंबईत सांगितले, या प्रकरणात सीबीआय 2 ते 3 दिवसांत चौकशीचे आदेश काढणार आहे. ते म्हणाले, 3 जून रोजी मुंडे यांच्यासोबत सुरक्षा अधिकारी नव्हता. हा घातपात होता का? या प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून अपघाताच्या चौकशीची मागणी होत आहे.

राजकीय भांडवल नको
आमदार पंकजा पालवे यांनी पत्रक काढून मुंडेंच्या चौकशीचे राजकीय भांडवल करू पाहणार्‍यांना बळी पडू नका, असे आवाहन केले आहे. चौकशीबाबत फडणवीस व खडसे यांच्याशी बोलणे झाले असून पंतप्रधानांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.