आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Approve To Farmer Guarantee Rate On Bonus

किमान हमी भाव: कडधान्याला केंद्राचा २०० रुपये बोनस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/औरंगाबाद- केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी किमान हमी भाव बुधवारी जाहीर केले. कडधान्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी मोदी सरकारने कडधान्यांना क्विंटलमागे २०० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर धान (तांदूळ), संकरित ज्वारी, मालदांडी ज्वारी,बाजरी, मका आदी पिकांच्या किमान हमी भावात क्विंटलमागे १५ ते ५० रुपये वाढ केली आहे. तर कापसाचा हमी भाव क्विंटलमागे ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे.

...तरच फायदा :
सरकारने तांदूळ ,गव्हाप्रमाणे कडधान्यांची खरेदी केली तरच या बोनससह दिलेल्या हमी भावाचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यादृष्टीने खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

किमान हमी भाव का ?
शेतकऱ्यांकडून सरकार ज्या दराने धान्य खरेदी करते त्यास किमान हमी भाव असे म्हणतात. कृषी खर्च व मूल्य आयोग दरवर्षी विविध पिकांच्या भावांची हंगामापूर्वी शिफारस करते. या शिफारशी सरकार सहसा स्वीकारते. त्यानुसार २०१५-१६ च्या खरीप हंगामासाठी केंद्राने हमी भाव जाहीर केले आहेत. एक ऑक्टोबर २०१५ पासून होणाऱ्या खरेदीसाठी हे भाव लागू होतील.

यंदाचे वेगळेपण
कडधान्यांसाठी बोनस
यंदा आयोगाने केलेल्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या असल्या तरी, कडधान्यांसाठी क्विंटलमागे २०० रुपये बोनस देण्यात येणार आहे. कडधान्यांचे उत्पादन वाढावे म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

बाेनस कशासाठी
>कडधान्य उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे
>मूग, उडीद, तुरीचा पेरा वाढण्यासाठी
>डाळींच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी
>डाळींची आयात टाळण्यासाठी

कापसाला ५० रु. वाढ
मराठवाडा व विदर्भासाठी महत्त्वाचे व नगदी पीक असलेल्या कापसाच्या किमान हमी भावात क्विंटलमागे ५० रुपये वाढ करण्यात आली आहे. लांब धाग्यांच्या कापसासाठी ४१०० रुपये, तर मध्यम धाग्यांच्या कापसासाठी ३८०० रुपये प्रति क्विंटल
असा भाव जाहीर करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर
>सरकारने कडधान्याला बोनस दिला ही शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. यंदा पाऊसमान चांगले झाल्यास सोयाबीन, मूग, उडीद यांचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. चांगल्या हमी भावामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळेल. कडधान्यांच्या पेऱ्यात वाढ होईल. उत्पादन वाढून खुल्या बाजारात भाव घसरल्यास किमान हमी भाव हा शेतकऱ्यांसाठी चांगला आधार ठरणार आहे.
-नानासाहेब अधाने, सचिव, जिल्हा बाजार समिती, औरंगाबाद

कडधान्यांचे गणित
०२ दशलक्ष टन कडधान्य उत्पादनात घट २०१४-१५ मध्ये
०४ दशलक्ष टन डाळींची आयात देशातील मागणी पूर्ततेसाठी
६४% वाढ कडधान्याच्या किमतीत एक वर्षात

महाराष्ट्राला गतवर्षी अवकाळी, दुष्काळाचा फटका
६४% घट २०१४-१५ मध्ये महाराष्ट्रातील कडधान्य उत्पादनात
३०% घट २०१४-१५ मध्ये तृणधान्य उत्पादनात
१७% वाढ २०१४-१५ मध्ये ऊस उत्पादनात
३५% मागील खरिपात पेरणीत घट