आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखोंनी साेडले अनुदान, खासदार कधी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘देशहितासाठी गॅस अनुदान सोडा’ या पंतप्रधान नरेेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत ५.५ लाख लोकांनी सबसिडी सोडली. यामुळे देशाचे वार्षिक १०२ कोटी वाचले.लाखोंचे वेतन-भत्ते घेऊनही सबसिडीतील भोजन करणार्‍या खासदारांपुढे त्यांनी आदर्श उदाहरण सादर केले आहे.

मंगळवारी समोर आलेल्या माहितीनुसार संसदेतील उपाहारगृहात खाण्यापिण्याच्या पदार्थांवर गेल्या पाच वर्षांत सरकारने सबसिडी म्हणून ६०.७९ कोटी रुपये दिले आहेत. येथे तब्बल १५० टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते. खासदार आणि त्यांच्या सहकार्‍यांसाठी कँटिनमध्ये खाण्या-पिण्याचे ८३ आयटम आहेत. आजही येथे १८ रुपयांत शाकाहारी आणि ३३ रुपयांत मांसाहारी थाळी मिळते. देश स्वतंत्र झाल्यानंतर येथील खाद्यपदार्थांच्या किमतीत तीन-चार वेळेसच बदल झाले. शेवटच्या वेळेस डिसेंबर २०१० मध्ये. सुभाष अग्रवाल यांनी आरटीआयच्या माध्यमातून ही माहिती मिळवली.

सकारात्मक तोडगा निघावा : नायडू
सबसिडीच्या मुद्द्यावर होत असलेली चर्चा चांगली असून त्यावर सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा बुधवारी संसदीय कामकाजमंत्री वैंकैय्या नायडू यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, हा मुद्दा संसदीय समितीच्या अखत्यारीत आहे. त्यांनी यावर लक्ष द्यावे. आपण एकटेच जबाबदार नाही. ही सबसिडी बर्‍याच काळापासून सुरू आहे. भाजप सरकारची त्यात काहीही भूमिका नसल्याचे स्पष्टीकरण नायडू यांनी दिले. दरम्यान, दरांचा फेरआढवा घेण्यात यावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते टाॅम वडाक्कन यांनी दिली.

२३ खासदार म्हणाले-सबसिडीच नव्हे, तर कँटीनही बंद करा
संसदेतील कँटिनमध्ये सबसिडीवरून टीका होत असल्याने अनेक खासदारांनी बचावात्मक पवित्रा घेतला. दिव्य मराठी नेटवर्कने काँग्रेस, भाजप, सपा, बसप, जदयू, आप आणि जदयूच्या २३ खासदारांशी संवाद साधला. काँग्रेसचे दिग्विजयसिंह म्हणतात, सबसिडी बंद होण्याला हरकत नाही. तसेही खासदार कँटीनमधून काही घेत नाही. बहुतांश स्टाफ, संसदेत जाणारेच लोक तेथे खातात. जोधपूरचे खासदार गजेंद्रसिंह शेखावत यांनीही सबसिडी बंद करण्यास पाठिंबा दर्शवला. सधनांसाठी सबसिडीला काही अर्थ नसल्याचे ते म्हणाले. जदयूच्या जयप्रकाश यादवांनी सांगितले, सबसिडीच नव्हे, तर कँटीनही बंद करायला हवे. भाजपचे मेघराज जैन म्हणाले, कोणत्याही पातळीवर सबसिडी सोडण्याचा पुढाकार घेतल्यास आपणच प्रथम ती सोडू. भोपाळमधील भाजपचे खासदार आलोक संजर म्हणाले, गॅस सबसिडी सोडली होती, हीदेखील सोडू. काँग्रेसचे सत्यव्रत चतुर्वेदी यांना सबसिडीत घोटाळ्याची शक्यता वाटते. विजयालक्ष्मी साधो म्हणतात, सर्वसामान्यांप्रमाणे आम्हीही बाहेरूनच खरेदी करून खाऊ.
बातम्या आणखी आहेत...