आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"अच्छे दिन'चे सरकार फेल, राहुल गांधीचा लोकसभेतही सरकारवर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - परदेशात दीर्घ रजा साजरी करून परतल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आक्रमक रूप धारण केले आहे. रविवारी किसान रॅलीत नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर सोमवारी लोकसभेतही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "सुटाबुटातील सरकार', "श्रीमंतांचे सरकार' अशा प्रकारचे शब्दप्रयोग करून त्यांनी त्यांच्यातील बदलाचे प्रात्यक्षिकही दिले. शिवाय, पंतप्रधानांनी प्रत्यक्षात जाऊन शेतक-यांची अवस्था पाहायला हवी, असा सल्लाही द्यायला राहुल गांधी विसरले नाहीत.

संसद अधिवेशनाचे दुसरे सत्र सोमवारपासून सुरू झाले. अपेक्षेप्रमाणेच विरोधकांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. याचा प्रत्यय राहुल गांधी यांच्या आक्रमकतेतून पाहायला मिळाला. लोकसभेत शेतीविषयक स्थितीबाबत चर्चेदरम्यान त्यांनी सर्वप्रथम केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, गडकरी हे केंद्र सरकारमधील अंत:करणातून बोलणारे एकमेव नेते आहेत. शेतक-यांची सरकारच नव्हे तर ईश्वरही मदत करू शकणार नाही,असे गडकरींनी म्हटले होते. त्यावरून राहुल गांधी यांनी हा टोला लगावला होता. दरम्यान, गांधींनी या वेळी गारपीटीच्या नुकसानाचे विविध तपशीलही मांडले. लोक वेदनेने व्याकूळ झालेले आहेत. सरकार उचलत नसल्याने गहू बाजार समित्यांमध्ये असाच पडला आहे. शेतकरी खते मागण्यासाठी गेले तर त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो, या वेदना पाहण्यासाठी पंतप्रधान शेतक-यांमध्ये का जात नाहीत? असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. त्याचवेळी संसदेत उपस्थित काँग्रेसचे अन्य खासदार पंतप्रधानांना परदेश दौ-यातूनच सवड नसल्याचे वक्तव्य करत होते.
मोदीजी, ६०% लोकांना नाराज करीत आहात
मोदींना राजकीय समीकरणे कळत असतील तर शेतीवर आधारित ६० टक्के लोकांना ते नाराज का करत आहेत, हे मला कळत नाहीये हा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, शेतक-यांच्या शेतीची किंमत वेगाने वाढत आहे. तुमच्या (मोदींच्या) उद्योगपती मित्रांना जमिनी हव्या आहेत. त्यामुळे तुम्ही शेतक-यांना कमकुवत बनवण्याचा घाट घातला आहे. ते कमकुवत बनताच तुम्ही अध्यादेशाची कुऱ्हाड चालवणार.

नुकसानीवर सरकारची वेगवेगळी वक्तव्ये
देशातील नुकसानदायक परिस्थितीवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी सरकारच्या वेगवेगळ्या वक्तव्यांचाही या वेळी समाचार घेतला. ते म्हणाले, देशातील नामवंत कृषी तज्ज्ञांच्या मते १४ राज्यांतील १.८० लाख हेक्टर शेतीत सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा नुकसान झाला आहे. मात्र, पंतप्रधान फक्त १.०६ लाख हेक्टर शेतीच धोक्यात असल्याचे सांगतात. याऊलट कृषी मंत्रालयाच्या मते ८० हजार हेक्टरची शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान सत्य की मंत्रालय? एका ठिकाणी एक, दुस-या ठिकाणी दुसरेच आणि त्यानंतर आम्ही सर्व एकच वक्तव्य करत असल्याची ओरड करायची, हीच भाजपची पद्धत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी या वेळी केला.