आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोहर पर्रीकर चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री; उद्या 11 वाजता बहुमत सिद्ध करण्याचा आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षाध्यक्ष शहा आणि केंद्रीय मंत्री गडकरींनी पर्रीकरांचे स्वागत केले. - Divya Marathi
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षाध्यक्ष शहा आणि केंद्रीय मंत्री गडकरींनी पर्रीकरांचे स्वागत केले.
पणजी- मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी सायंकाळी चौथ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राज्यपालांनी सात आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. दरम्यान, पर्रीकरांची निवड आणि त्यांच्या शपथविधीवर स्थगिती आदेश देण्याची काँग्रेसची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. राज्यपालांसमोर आपल्या संख्याबळाची माहिती न देता, त्यांच्याशी कोणताही संवाद न साधता थेट न्यायालयात कसे आलात? राज्यपालांच्या घरासमोर धरणे का दिली नाहीत? अशा शब्दांत काँग्रेसला फटकारले.

राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सरकार स्थापनेसाठी पर्रीकरांना पाचारण करून मुख्यमंत्री नियुक्त केल्याच्या निर्णयाला काँग्रेसने आव्हान दिले होते. याचिकेत काँग्रेसने मांडलेल्या मुद्द्यांवर काेर्टाच्या आदेशापेक्षा विधानसभेतील शक्तिप्रदर्शनाने समाधान होऊ शकेल, असे न्यायालयाने नमूद केले. दरम्यान,  पर्रीकर यांना मुख्यमंत्री नेमून राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली असली तरी सुप्रीम काेर्टाने त्यांना गुरुवारी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १७ तर भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या. भाजपने मगाेपच्या ३, गोवा फॉरवर्ड पार्टीच्या ३ व २ अपक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता.

त्यांनी वेळ दिला नाही 
१२ मार्चला काँग्रेसने राज्यपालांना भेटण्याची वेळ मागितली होती. त्यांनी वेळ दिला नाही, असा आरोप काँग्रेसचे गोव्याचे प्रभारी दिग्विजयसिंह यांनी केला. लोकसभेतही गोवा, मणिपूर मुद्दा गाजला. या दोन राज्यांत लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप करत काँग्रेसने सभात्याग केला.
 
कोर्टात काय झाले
- कोर्टाने विचारले, की तुम्ही तुमच्या समर्थक आमदारांची यादी राज्यपालांना दिली होती का? तुमच्याकडे किती सदस्य आहेत? जर तुम्ही आधी राज्यपालांकडे गेले असते आमि नंतर येथे आले असते तर आम्हाला निर्णय घेणे सोपे झाले असते. 
- मीडिया रिपोर्टसनुसार, काँग्रेसकडे जर बहुमत होते तर त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा का केला नाही? किंवा राजभवनाबाहेर धरेणे का धरले नाही ? जर तुमच्याकडे बहुमत आहे, तर तुमच्या समर्थकांचे अॅफिडेव्हिट सोबत का जोडले नाही, ज्यामुळे सिद्ध झाले असते की तुमच्याकडे बहुमत आहे. 
- सुप्रीम कोर्टात काँग्रेसच्या वतीने अभिषेक मनु संघवी यांनी बाजू मांडली, तर सरकारच्या वतीने हरिष साळवी बोलत होते. 
 
फक्त दोन दिवसांचे मुख्यमंत्री असतील पर्रीकर
- काँग्रेसचे वकील अभिषेक मनु संघवी म्हणाले, सुप्रीम कोर्टाने आमचे म्हणणे साधारण दीड तास गांभीर्याने ऐकून घेतले. यावेळी आम्ही अनेक मुद्दे उपस्थित केले. आमचे म्हणणे होते की राज्यपालांनी संकेतांचे पालन करत सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रित करायला पाहिजे. याशिवाय बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची दिलेली मुदतीचा मुद्दाही आम्ही उपस्थित केला. 
- कोर्ट म्हणाले, पर्रीकर बहुमत सिद्ध करु शकले नाही तर दोन दिवसांचे मुख्यमंत्री राहातील. 
 
भाजप घोडेबाजार करत नाही - गडकरी 
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, गोव्यात हॉर्स ट्रेडिंग (घोडे बाजार) वगैरे काही होत नाही. गैरभाजप सदस्यांच्या काही अटी आहेत. आमदारांनी त्यांच्या संमतीने पाठिंबा दिला आहे. 
- काँग्रेसला आपसातील वादामुळे विधिमंडळ पक्षाचा नेता निवडता आला नाही. त्यासाठी आम्हाला दोषी ठरवले जात आहे. 
 
काय आहे काँग्रेसचा आरोप 
- काँग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंह म्हणाले, विधानसभा निवडणूक निकालानंतर दुसऱ्याच दिवशी (12 मार्च) आम्ही सरकार स्थापनेचा दावा सादर करणार होतो. मात्र राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी रविवारी भेटीसाठी वेळ दिला नाही. 
- नियमीत आणि ठरलेल्या प्रक्रियेला फाटा देत राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाऐवजी भाजपला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. 
- काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की भाजपकडे संख्याबळ नसताना आणि क्रमांक दोनचा पक्ष असतानाही राज्यपालांनी त्यांना दिलेले निमंत्रण घटनाविरोधी आहे. त्यामुळे पक्षाने सोमवारी सायंकाळी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले. कोर्टाने होळीची एक आठवड्याची सुटी असताना या प्रकरणासाठी एक विशेष पीठ स्थापन केले. 
 
हा तर लोकशाहीचा खून - काँग्रेस 
- गोव्यात भाजप लोकशाहीचा खून करुन सरकार स्थापन करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेसाठीचे निमंत्रण आम्हाला मिळायला पाहिजे होते. 
- काँग्रेसने याविरोधात संसदेत आवाज उठवला. कोणत्याही स्थितीत सरकार स्थापन करायचेच या भाजपच्या नीतीविरोधात काँग्रेसने लोकसभेतून सभात्याग केला. 
 
काय आहे गोव्यातील स्थिती 
मॅजिक फिगर 21
काँग्रेस
-17 
भाजप - 13
गोमंतक फॉरवर्ड पार्टी - 03
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष - 03
राष्ट्रवादी काँग्रेस - 01
अपक्ष - 02 
 
पर्रीकर यांनी राज्यपालांना भेटून आपल्याला 22 आमदारांचा पाठिंबा असल्याचे दाखवून सरकार स्थापनेचा दावा केला होता. गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांचे प्रत्येकी 3, तसेच अपक्ष रोहन खौंटे आणि भाजप पुरस्कृत अपक्ष गोविंद गावडे यांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. 

पर्रीकरांसोबत आठ आमदार शपथ घेणार
मनोहर पर्रीकर यांच्यासोबत जवळपास आठ आमदार मंगळवारी (दि. 14) शपथ घेतील. गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी व अपक्षांतून प्रत्येकी दोन तर भाजपच्या 2 ते 3 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा,
> काय म्हणाले काँग्रेस आमदार
> गडकरी म्हणाले- काँग्रेसला द्राक्ष अंबट
> भाजपने बहुमत चोरले, चिदंबरम यांचा आरोप 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...