आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा-मिस्त्री वाद: तूर्त हस्तक्षेप नाही, उद्योग राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांचे स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर/नवी दिल्ली- टाटा समूहातील सध्याच्या वाटाघाटींवर सरकारचे बारीक लक्ष आहे. मात्र, तो त्यांचा अंतर्गत वाद असल्याने त्यात सरकार सध्या हस्तक्षेप करणार नाही, असे केंद्रीय उद्योग राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी शुक्रवारी म्हटले आहे.

ते म्हणाले, सेबी किंवा अन्य कोणत्याही नियामक मंडळाकडून याबाबत काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांनी विनंती केल्यास यावर विचार केला जाईल. टाटा सन्सने सोमवारी सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून पायउतार केले आणि त्यांच्या जागी रतन टाटा यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर मिस्त्री यांनी टाटा समूहावर फसवणुकीसह अनेक प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत. प्रत्युत्तरात टाटा सन्सने म्हटले की, मिस्त्री समूहाच्या प्रतिमेवर चिखलफेक करत असून ते अक्षम्य आहे. मेघवाल एका कार्यक्रमानिमित्त गांधीनगर आले होते.

इंडियन हॉटेल्स कंपनी सर्वोच्च न्यायालयात : टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्स कंपनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. उच्च न्यायालयाने मानसिंग हॉटेलच्या लिलावावर बंदी घालण्याची कंपनीची याचिका फेटाळली होती. एनडीएमसीकडून याचा लिलाव होणार होता. सध्या याचे कारभार इंडियन हॉटेल्सकडेच आहे. एनडीएमसीने कंपनीला ही संपत्ती ३३ वर्षांच्या भाडेकरारावर दिली होती. २०११ मध्ये त्याची मुदत संपली असून त्यानंतर ९ वर्षांची मुदतवाढही मिळाली आहे.

युरोपातील स्टील उद्योग विकण्याची तयारी
टाटा स्टीलकडून सांगण्यात आल्याप्रमाणे, युरोपातील थाइसेनक्रुप हा स्टील उद्योग विकण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. परंतु याबाबत समझोता होणार की नाही याची हमी देता येत नाही. टाटा स्टीलने स्टॉक एक्स्चेंजला याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते, साऊथ यॉर्कशायरस्थित स्पेशालिटी स्टील विक्रीसाठी वेगळी पद्धत अवलंबली जाईल आणि योग्य वेळी त्याबाबत घोषणा केली जाईल. दरम्यान, कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचारी येथील कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करत राहतील.

तीन दिवसांच्या घसरणीनंतर तेजी
तीन दिवसांत २६ हजार अब्ज रुपये गमावल्यानंतर शुक्रवारी टाटा समूहाच्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली. टाटा मोटर्स २.६८,
टाटा स्टील १.८५, टाटा मेटालिक्स ५.८६, टाटा टेलिसर्व्हिसेस ३.९३ आणि टाटा कम्युनिकेशन्समध्ये १.३५ टक्क्यांची वाढ झाली.
मात्र, टीसीएस या टाटा समूहाच्या सर्वात मोठ्या कंपनीच्या शेअर्समध्ये ०.५८ टक्क्यांची
घसरण झाली.

एसआयटी चौकशीसाठी स्वामींचे मोदींना पत्र
एअर एशियामधील फसवणुकीच्या आरोपांची विशेष चौकशी पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून केली आहे. स्वामी यांनी यापूर्वीही एअर एशिया व विस्तारा एअरलाइन्समधील रतन टाटा यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली होती. एअर एशियामध्ये २० कोटी रुपयांचा अवैध व्यवहार झाल्याचा आरोप सायरस मिस्त्री यांनी केला होता.
बातम्या आणखी आहेत...