आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Not Paid 600 Crore Of Air India For VIP Tours

एअर इंडियाची सरकारकडे ६०० कोटींची थकबाकी, व्हीव्हीआयपी प्रवासाचे पैसे थकवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रोख रकमेची चणचण असणा-या एअर इंडियाचे ६०० कोटी रुपये सरकारकडे थकले आहेत. व्हीव्हीआयपी प्रवासानंतर सरकारने ही रक्कम चुकती केलेली नाही. तोट्यात असणा-या एअर इंडियावर सध्या ४० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.

एअर इंडियाच्या विमानांचा वापर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री यांच्याशिवाय इतर व्हीव्हीआयपी करतात. यांच्या प्रवासासाठी एअर इंडियाच्या ताफ्यात पाच डबल डेकर विमाने आहेत. अधिकृत सूत्रांनी सांगितले, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हा मुद्दा विविध मंत्रालयांकडे उपस्थित केला आहे. गृह आणि परराष्ट्र मंत्रालयासह इतर मंत्रालयांकडे ३१ मार्च २०१५ पर्यत ५०० ते ६०० कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे.

डिसेंबरमध्येच नफ्यात आली एअर इंडिया
आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये एअर इंडियाला ५,३८८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर मागील आर्थिक वर्षात (२०१३-१४) कंपनीला ५,४९० कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मागील वर्षी डिसेंबरमध्ये एअर इंडिया प्रथमच नफ्यात आली होती. त्या महिन्यात कंपनीला १४.६ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

डिसेंबर २०१३ मध्ये एअर इंडियाला १६८.७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. एअर इंडियाने मागील महिन्यात चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात म्हटले आहे की, पुढील वर्षी मार्चपर्यंत कंपनी ऑपरेशनली प्रॉफिटेबल होईल. एअर इंडियाला २०१२ मध्ये बेलआऊट पॅकेज देण्याचे जाहीर झाले होते. यूपीए सरकारने एप्रिल २०१२ मध्ये एअर इंडियाच्या टर्नअराउंड योजनेला मंजुरी दिली होती. सरकारने नऊ वर्षांत एअर इंडियाला ३०,२३१ कोटी रुपये देण्याचे निश्चित केले होते.