पुरस्कारविजेते (डावीकडून) मोहित दळवी, वैभव घांगरे, रेखा सहस्रबुद्धे (गौरवची आई) आणि नीलेश भिल.
नवी दिल्ली- राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची सोमवारी घोषणा करण्यात आली. देशातील २५ बालकांना २४ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुरस्काराने गौरवण्यात येणार अाहे. त्यात महाराष्ट्रातील ४ बालकांचा समावेश आहे. शौर्य पुरस्कारामधील सर्वोच्च गणला जाणारा ‘भारत पुरस्कार’ नागपूरच्या गौरव सहस्रबुद्धेला मरणोत्तर जाहीर झाला. जळगाव जिल्ह्यातील कोथळीच्या नीलेश भिल, वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वेच्या वैभव घंगारे आणि मुंबईतील वाळकेश्वरच्या मोहित दळवीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
नागपूरच्या गौरव सहस्रबुद्धे याने अंबाझरी तलावात बुडणाऱ्या ४ मुलांचा प्राण वाचवला, त्यात त्याला स्वत:चा प्राण गमावावा लागला. दहावीत शिकणारा गौरव ३ जून २०१४ ला ४ मित्रांसह अंबाझरी तलावाजवळ खेळताना त्याचे मित्र पाण्यात बुडाले. त्याने आपल्या तीन मित्रांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. त्याच्या साहसी कर्तृत्वासाठी त्याला ‘भारत पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. गौरवची आई रेखा सहस्रबुद्धे हा पुरस्कार स्वीकारणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावचा निलेश रेवाराम भिल हाही या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. ३० ऑगस्ट २०१४ ला ऋषिपंचमीच्या दिवशी बुलडाणा येथील ओंकार उगले हे कुटुंबीयांसह कोथळी येथे संत मुक्ताईच्या दर्शनासाठी आले होते. त्यांचा ११ वर्षांचा मुलगा भागवत मंदिरासमोरच्या घाटावर पाय धुण्यासाठी गेला असता पाण्यात पडला. दर्शनासाठी आलेल्या नीलेश भिलच्या ते लक्षात येताच त्याने क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी घेऊन भागवतचे प्राण वाचवले. नीलेश भिल हा कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेत पाचव्या वर्गात शिकतो. वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथील सहाव्या वर्गात शिकणाऱ्या वैभव रामेश्वर घंगारे याने २६ जुलै २०१४ ला गावातील नदीकिनारी पुरात वाहून जाणाऱ्या मित्राचे प्राण वाचवले होते. मुंबईतील वाळकेश्वर भागात आत्याकडे राहणाऱ्या मोहितने परिसरातील तलावात स्नान करताना बुडत असलेल्या मुलीचे प्राण वाचवले. ३ मुली आणि २२ मुले अशा एकूण २५ बालकांना वर्ष २०१५ च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.