आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Government Opponant Busy To Quarrel To Eachother

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकार-विरोधक पाकला सोडून एकमेकांशीच भांडण्‍यात व्यस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकिस्तानी हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी सरकार-विरोधक पाकला सोडून एकमेकांशीच भांडत बसल्याचे चित्र दिसले. पाकला क्लीन चिट दिल्यावरून संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी देशाची माफी मागावी यावर भाजप अडला, तर रालोआ राजवटीत सीमेवरील बळींची आकडेवारी काँग्रेस देत बसली.

रालोआच्या काळात काश्मिरात दरवर्षी 874 जण मारले गेले आहेत. यूपीए राजवटीत गतवर्षी फक्त 15 जणांचाच बळी गेला, असे काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी ट्विटरवर म्हटले. देशावरील हल्ल्याचा निषेध करण्याऐवजी सरकार-विरोधक एकमेकांशी भांडत बसल्याची ही बहुधा पहिलीच घटना असेल. संसदेचे कामकाज बुधवारी गदारोळानेच सुरू झाले. लष्कर व संरक्षणमंत्र्यांच्या विरोधाभासी विधानांचा मुद्दा सुषमा स्वराज, रविशंकर प्रसाद यांनी मांडला. प्रचंड गदारोळानंतर संरक्षणमंत्री राज्यसभेत आले. लष्करप्रमुख पूंछहून परतल्यानंतर तपशील सांगितला जाईल. तेव्हा आणखी माहिती देतो, असे ते म्हणाले. त्यावर समाधान न झाल्याने भाजपने गदारोळ सुरूच ठेवला.

अँटनींविरुद्ध हक्कभंग नोटीस
तत्पूर्वी ए.के. अँटनी यांच्या एका वक्तव्यावरून भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी संसदेत त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस बजावली. संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यास सिन्हा यांनी हास्यास्पद ठरवले. अँटनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री आहेत काय, असा सवाल त्यांनी केला. उत्तरात संसदीय कार्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, या प्रकरणाला हक्कभंगाचे कलम लागूच होत नाही. उपलब्ध माहितीच्या आधारावरच अँटनी यांनी संसदेत वक्तव्य केले होते. दिवसभराच्या गदारोळानंतर संरक्षणमंत्री अँटनी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.
बदलती वक्तव्ये
1. मंगळवारी दुपारी संसदेत संरक्षणमंत्री अँटनी म्हणाले, पाकिस्तानी लष्करी वर्दीतील अतिरेक्यांनीच हल्ला केला. जुलै-ऑगस्टमध्ये 19 अतिरेक्यांना ठार केल्यामुळे हा हल्ला झाला.

2. संरक्षण मंत्रालयाचे जम्मू पीआरओ आचार्य यांनी दुपारी 3.46 वाजता पत्रक जारी केले. हल्ल्यात पाक लष्कराच्या बॉर्डर अँक्शन टीमचा सहभाग असल्याचे त्यात म्हटले. पत्रकाला उधमपूर नॉर्थ कमांड मुख्यालयाने मंजुरी दिली.

3. वादानंतर आचार्यांनी संध्याकाळी 6.53 वा. सुधारित पत्रक जारी केले. संरक्षणमंत्र्यांची संसदेतील माहितीच त्यात होती. केंद्राच्या दबावामुळे पत्रक बदलल्याचा आरोप विरोधकांनी केला.
.. आणि काँग्रेसचा बचाव

1. एनडीए राजवटीत (1998-2004) जम्मू-काश्मिरात एकूण 6,115 लोक म्हणजेच दरवर्षी 874 जण ठार झाले. याउलट यूपीएच्या कार्यकाळात गेल्या वर्षी फक्त 15 जण मरण पावले.

2. एनडीए राजवटीत एकूण 23,603 अतिरेकी कारवाया झाल्या. म्हणजेच दररोज 3,372 कारवाया. याउलट यूपीएच्या काळात गेल्या वर्षी फक्त 220 अतिरेकी कारवाया झाल्या.

3. आग्रा परिषद, लाहोर घोषणा आणि कारगिल हल्ल्यादरम्यान भाजपची धोरणे सपशेल अपयशी ठरली आहेत. याउलट यूपीएच्या धोरणांमुळेच मागील काही दिवसांत दहशतवादी कारवाया घटल्या आहेत.