आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Reaches Out To Opposition To Unlock Intolerance And GST

\'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षेनंतरही देश सोडण्याची भाषा केली नाही\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संविधान दिनी संसदेत संबोधित करताना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी - Divya Marathi
संविधान दिनी संसदेत संबोधित करताना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
नवी दिल्ली- घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रऋषी आहेत. त्यांना देशात प्रचंड अपमान सहन करावा लागला. परंतु त्यांनी कधीही देश सोडून जाण्याची भाषा केली नाही. उलट तळागाळातील नागरिकांसाठी मोठा संघर्ष केला. सशक्त भारताच्या निर्मितीसाठी अथक परिश्रम घेतल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अभिनेता आमिर खानसह देश सोडून जाण्याची भाषा करणाऱ्यांवर अप्रत्यक्ष हल्ला केला. संविधान दिनानिमित्त संसदेत केलेल्या भाषणात सिंह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला. त्यानंतर बोलण्यासाठी उभ्या राहिलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्यांचा घटनेच्या निर्मितीत काडीचाही सहभाग नव्हता आणि ज्यांना घटनेबद्दल आस्था नाही असे आज भारतीय संविधानाची जपमाळ घेऊन बसले असल्याची टीका केली.

देशात सेक्युलर अर्थात धर्मनिरपेक्ष या शब्दाचा दुरुपयोग होत असल्याचे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. त्यावर विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सिंह यांच्या वक्तव्यावर हरकत नोंदवताना म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूळचे भारतीय होते. तुम्ही आर्य आहेत त्यामुळे तुम्ही बाहेरून आल्याने देशाबाहेरील आहात असा थेट भाजपवर आरोप केला. सेक्युलर या शब्दाचा अर्थ पंथनिरपेक्ष असून तो आहे तसाच वापरायला हवा, असा आग्रही राजनाथ सिंह यांनी धरला आहे.

दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज (गुरुवारी) सुरुवात झाली. अधिवेशन सुरु होताच लोकसभा व राज्यसभेच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्‍यात आली. मात्र, देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणणे, हे संसदेचे काम आहे. तसेच संवाद हाच संसदेचा आत्मा आहे. इतर कामांसाठी तर संपूर्ण देशातील मैदाने खुली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेबाहेर पत्रकारांना संबोधित करताना सांगितले. अधिवेशन रचनात्मक आणि सार्थक होण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पंतप्रधानी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने '26 नोव्हेंबरला संविधान दिन'वर पहिल्यांदा संसदेत चर्चा करण्यात येत आहे. दोन्ही सभागृहांत राज्यघटनेवर चर्चा करण्यासाठी सगळ्याच पक्षांनी अनुकूलता दाखवली आहे. त्यामुळे भारतीय संविधानावर पुढील दोन दिवस (शुक्रवार व सोमवार) चर्चा करण्‍यात येणार आहे.

देशाच्या संविधानावर बोलताना पंतप्रधान म्हणाले, देशाचे संविधान हे आशेचा किरण आहे. होप (HOPE) म्हणजे हार्मनी (H), ऑपॉर्च्युनिटी(O), पब्लिक पार्टिसिपेशन (P), इक्वॅलिटी (E) आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी 'टि्‍वटर'च्या माध्यमातून देशातील जनतेला संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संविधानाचे मुल्य प्रत्येक भारतीय नागरिकाने जपावे. तसेच राष्ट्राच्या निर्मात्यांना अभिमान वाटेल, असा देश घडवण्याचेही आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

लोकसभेच्या 13 दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अधिवेशनाचे कामकाज शांततेत पार पडेल, अशी अशा लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली आहे.

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे भाषण सुरु...
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी संसदेत संविधानावर चर्चा करताना भाजप सरकारवर निशाणा साधला. घटनानिर्मितीसाठी ज्यांनी कुठल्याही प्रकरे योगदान दिले नाही, ते लोक आज चर्चा करत असल्याचा टोला सोनियांनी लगावला. यावर भाजपच्या नेत्यांनी गदारोळ करताच लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन म्हणाल्या, आपण सगळे घटनेच्या निर्मितीनंतर जन्माला आले आहोत.

> घटनानिर्मितीमध्ये काँग्रेसचे मोलाच योगदान- सोनिया गांधी
> देशात घटनेतल्या मूल्यांवरच घाला घातला जात आहे - सोनिया गांधींचा आरोप
> घटनानिर्मितीसाठी पंडीत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद व मौलाना आझाद यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले - सोनिया गांधी
> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसुचित जाती जमातींच्या हक्कांसाठी प्रचंड संघर्ष केला आहे. - सोनिया गांधी
> घटना समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस पार्टीला शिस्तप्रिय संबोदले होते. योग्य श्रेय दिले होते -सोनिया गांधी

काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह
>संविधानामुळे भारत अखंडीत- केंद्रीय गृहमंत्र‍ी राजनाथ सिंह
>संविधानाने देशाला एकसंघ ठेवले- राजनाथ सिंह
>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वाना जोडणारा घटक बहाल केला- राजनाथ सिंह
> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देशात मोठा अपमान सहन करावा लागला- राजनाथ सिंह
>डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देश सोडून जाण्याची भाषा कधीच केली नाही- राजनाथ सिंह
> आरक्षण ही राजकारणाचा मुद्दा नाही तर सामाजिक, आर्थिक समानतेसाटी बाबासाहेबांनी आरक्षण महत्त्वाचे मानले - राजनाथ सिंह
> अस्पृश्यतेच्या विरोधात डॉ. आंबेडकरांनी मोठे आंदोलन केले- राजनाथ सिंह
> भारतामध्ये अनेक महत्त्वाच्या संस्था उभारण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान खूप महत्त्वाचे
> श्रमिक कल्याणासाठी कायदेशीर तरतुदींवर डॉ. आंबेडकरांचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे- राजनाथ सिंह
> तळागाळातल्या समाजाला उपयुक्त अनेक योजनांमध्ये डॉ. आंबेडकरांच्या बुद्धीचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. - राजनाथ सिंह
>स्वतंत्र भारतामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं योगदानही महत्त्वाचं असून ते कुणालाही नाकारता येणार नाही. - राजनाथ सिंह
>भारताला मिळालेली घटना ही अनेक दिग्गजांनी दिलेल्या योगदानाचा परिणाम आहे. - राजनाथ सिंह
>डॉ. आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेलांचं योगदान खूप महत्त्वाचे - राजनाथ सिंह
>देशात सेक्युलर शब्दाचा जास्त दुरुपयोग - राजनाथ सिंह
>धर्मनिरपेक्ष या शब्दांचा वापर बंद करायला हवा - राजनाथ सिंह
>धर्मनिरपेक्ष ऐवजी पंथनिरपेक्ष असा शब्दप्रयोग व्हावा - राजनाथ सिंह
>देशात जन्मलेला प्रत्येक नागरिक भारतीयच - राजनाथ सिंह

सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज
असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांने भाजप सरकार घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. असहिष्णुतेसह जीएसटी व भूमिअधिग्रहण विधेयकाचा मुद्दा उचलून धरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत. असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकार घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. अधिवेशन 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचा दारुण झाल्याने विरोधकांना चांगलेच बळ मिळाले आहे. त्यामुळे देशातील असहिष्णुतेच्या मुद्द्यांवर विरोधकांनी निंदाव्यंजक ठरावासाठी सरकारवर दबाव आणणासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, अधिवेशन रचनात्मक आणि सार्थक होण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केले आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारचा नरमाईचा सूर दिसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काहीवेळ या बैठकीला हजेरी लावली. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे अधिवेशन सार्थक आणि रचनात्मक पद्धतीने चालावे. काही चिंतेचे मुद्दे असतील तर अर्थमंत्री अरूण जेटली चर्चा करतील, असे आश्वासन मोदींनी विरोधकांना दिले.

तरी देखील असहिष्णुता, जीएसटी विधेयक व भूमीअधिग्रहण विधेयकाच्या मुद्यावरून हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेसने असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. यासाठी कॉंग्रेसने सरकारला नोटीस बजावली आहे.

कथित असहिष्णुतेचा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारितील असला तरी या मुद्यासह सर्व मुद्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. आम्ही अशा घटनांचे समर्थनही करत नाही आणि दुर्लक्षही करत नाही, असे सांसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले.

दादरी हत्याकांड आणि कन्नड लेखक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसारख्या अनपेक्षित घटनांबद्दल विरोधकांना असलेल्या चिंतेची आम्हाला जाणीव आहे. आम्ही अशा घटनांचे समर्थन करत नाही आणि कोणाला पाठीशीही घालणार, असे सरकारने म्हटले आहे.

अभिनेता आमिर खानने केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष असहिष्णुतेच्या मुद्यावर जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याचे चित्र सरकराने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिसून आले. असहिष्णुतेच्या मुद्यावर लवकर चर्चा घ्यावी आणि लेखक, साहित्यिक चित्रपट कलावंतांच्या पुरस्कार वापसीचा मुद्दा सरकारने सहज घेऊ नये यासाठीही ते बैठकीत आग्रही दिसले.

काय झाले बुधवारी?
> बुधवारी संपूर्ण दिवस सरकार व विरोधकांमध्ये चर्चेच्या फैरी उडाल्या
> अधिवेशनात कोणताही गदारोळ होणार नाही, कामकाज शांततेत पार पडेल, यासाठी सरकार प्रयत्न करेल.
> संसदेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी बुधवारी सायकांळी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती.
> अधिवेशन रचनात्मक आणि सार्थक होण्यासाठी चर्चा करण्यात आली.
> यापूर्वी भाजपच्या संसदीय मंडळ व एनडीएमधील घटक पक्षांची बैठक झाली.
> जीएसटीसारखी महत्त्वाची विधेयके मंजूर करून घ्यायची असल्याने मोदी सरकारने विरोधकांची मनधरणी करत सहकार्य मागितले आहे.

पुढील स्लाइडवरील व्हिडिओत पाहा, काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी...