नवी दिल्ली - दुरावत चाललेल्या मुस्लिमांसह अल्पसंख्याकांसाठी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विविध योजना आखत आहे. यात वैद्यकीय मदत, कौशल्य विकास, महिला नेतृत्व आदींचा समावेश आहे.
सरकारी योजनांचा प्रभावीपणे प्रचार करण्याच्या दृष्टीने प्रयत्नांची गरज असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे आता जियो पारसी, शिका आणि कमवा, नयी रोशनीसारख्या योजनांतील फायद्यांचा प्रसार अल्पसंख्याकापर्यंत व्हावा म्हणून नवी मोहीम आखली आहे. काँग्रेसने सोमवारी अल्पसंख्यंकाच्या 200 पेक्षा अधिक प्रतिनिधींची बैठक बोलावली. त्यांच्या मागण्या व सूचनांचा समावेश जाहिरनाम्यात करण्याचा उद्देश आहे.
याशिवाय सुलभ कर्ज, वक्फ सुधारणा, दुर्धर आजारग्रस्त अल्पसंख्यकांसाठी मौलाना आझाद शिक्षण फाउंडेशनच्या माध्यमातून नव्या आरोग्य योजनेसाठी नुकत्याच करण्यात आलेल्या प्रयत्नांवर काँग्रेस अधिक भर देत आहे. सध्याच्या योजनांसाठी 2013-14 वर्षासाठी 100 कोटी रुपयांचा निधी निर्धारित करण्यात आला आहे.
काँग्रेसने सोमवारी विविध अल्पसंख्यंक समुदायाच्या 200 पेक्षा अधिक प्रतिनिधींची बैठक बोलावली. या समुदायाच्या मागण्या व सूचनांचा समावेश लोकसभा निवडणूक घोषणापत्रात करण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली होती. यात प्रतिनिधींनी आपल्या चिंता, राग व तक्रारींचा पाढा वाचला. काँग्रेस पक्षाच्या हातून मुस्लिम व्होट बँक निसटत असल्याने तत्काळ भरीव उपायांची गरज असल्याचेही मत बैठकीत मांडण्यात आले.