आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यात वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, संसदीय समितीची सरकारला सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताची निर्यात कमी होत असल्यामुळे अर्थ मंत्रालयाशी जोडलेल्या संसदीय सल्लागार समितीने चिंता व्यक्त केली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मतही समितीने नोंदवले आहे. केंद्रीय वाणिज्य तथा उद्योगमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी गोव्यात समितीची बैठक पार पडली. गुणवत्तेसारख्या मुद्द्याच्या आड भारतीय निर्यात रोखण्याचे चीनचे प्रयत्न असल्याचे या वेळी सीतारमण यांनी सांगितले. याबाबत आपण चीनच्या व्यापारमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे सांगत त्यांनी अापला मुद्दा मान्य केल्याचेही सीतारमण यांनी सांगितले. मात्र, या दृष्टीने चीनने कोणतेच प्रयत्न केलेले दिसत नसल्याचेही त्या म्हणाल्या.

एप्रिल ते सप्टेंबर २०१५ दरम्यान निर्यातीमध्ये १७.६ टक्के, तर आयात १४.२ टक्क्यांनी कमी झाली असल्याची माहिती विदेशी व्यापार महानिदेशक अनुप वधावन यांनी दिली. त्यांनी सध्याच्या स्थितीत आयात आणि निर्यातीबाबत असलेल्या सर्व आकडेवारीची तपशीलवार माहिती दिली. कंपनीत उत्पादन झालेल्या मालाची निर्यात ६.५ टक्क्यांनी कमी झाली असून किमतीचा विचार केल्यास निर्यात ७२.७ अब्ज डाॅलरने घटून ६८ अब्ज डाॅलरवर आली आहे.
गेल्या सहामही आकडेवारीत एकूण निर्यातीत १६१.३९ अब्ज डाॅलरची घट होऊन निर्यात १३२.९३ अब्ज डाॅलर राहिली आहे.

सलग दहाव्या महिन्यात घसरण
युराेप आणि अमेरिकेत परंपरागत होणारी भारतीय उत्पादनांची मागणी कमी झाली आहे. तसेच पूर्व आशिया आणि अाफ्रिकी देशांमधून उत्पादन आणि इंजिनिअरिंग उत्पादनांची मागणी कमी झाली आहे. भारतीय निर्यातीमध्ये आॅक्टोबरमध्ये सलग दहाव्या महिन्यात घसरणीची नोंद झाली. यामुळे चालू आर्थिक वर्षात सरकारच्या वतीने निश्चित करण्यात आलेले निर्यातीचे उद्दिष्टदेखील पूर्ण होणार नसल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.