आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारच्या धोरणांवर गोविंदाचार्यांचा हल्लाबोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एकेकाळी भाजपचे तत्त्वचिंतक म्हणून आेळखले जाणारे गोविंदाचार्य यांनी मंगळवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. या सरकारची धोरणे यूपीए सरकारपेक्षा कोणत्याही अर्थाने वेगळी नाहीत. त्याच जुन्या पक्षपाती आणि घोटाळेबाज व्यवस्थेवर हे सरकार चालू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे संस्थापक असलेले गोविंदाचार्य यांनी पंतप्रधान मोदी यांनी आता "मेड फॉर इंडिया' व्हायला हवे, अशी टीका केली. हे सरकार स्थापन होऊन आज वर्ष होत आले आहे.

मात्र, अजून सरकारने केलेले एकही ठळक कार्य कुणी नमूद करू शकत नाही. एकीकडे हे सरकार दिशाहीन आहे, तर दुसरीकडे अंतर्गत मतभेदांनी ग्रासलेले आहे, असे गोविंदाचार्य म्हणाले.

लोकांच्या दृष्टीने मोदी
वेगळे आहेत. मला मात्र त्यांच्या धोरणांत काहीही वेगळेपण दिसत नाही, असे ते म्हणाले.
भूसंपादन विधेयक आणि स्मार्ट सिटीसारख्या प्रकल्पाबाबत मोदींनी आपल्या सल्लागारांपासून सावध राहावे, असा इशाराही गोविंदाचार्य यांनी दिला आहे. ज्या भूसंपादन विधेयकातील मूळ तरतुदी चुकीच्या आहेत त्या मोदींच्या डोक्यात भरवून देणारे हे सल्लागार कोण आहेत, असा प्रश्न पडतो, असे ते म्हणाले.

दोनच दिवसांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले अरुण शौरी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. या सरकारचे आर्थिक धोरण दिशाहीन असल्याचे त्यांनी म्हटले होेते. यानंतर गोविंदाचार्य यांनीही मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
बातम्या आणखी आहेत...