आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Tawade Says Grading System In Upcoming Higher Education

येत्या शैक्षणिक सत्रापासून उच्च शिक्षणात श्रेणी पद्धत - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील उच्च शिक्षणात निवड आधारित श्रेणी पध्दत लागू करण्यात येईल, अशी माहिती शालेय, उच्च व तंत्र शिक्षण तसेच मराठी भाषा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली. उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आवडीच्या विषयात शिक्षण घेण्याच्यासाठी ही पद्धत महत्वाची ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित निवड आधारीत श्रेणी पध्दत कौशल्य व श्रेणी आधारित आराखडा याबाबत मंगळवारी सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्याच्या बैठकीत तावडे यांनी सहभाग घेतला. शास्त्री भवन येथे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेवून त्यांनी राज्यातील विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा केली त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा तसेच विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे इतर विषयही शिकता यावेत यासाठी निवड आधारित श्रेणी पध्दत महाराष्ट्रातील विद्यापीठांमधे येत्या शैक्षणिक वषार्पासून लागू करण्यात येईल. राज्यात 'शाळा दर्पण योजना' येत्या शैक्षणिक वषार्पासून सुरु करण्यात येईल.

पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद , महानगर पालिकांच्या शाळांमधे ही योजना लागू होईल. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन, शिष्यवृत्ती, गुण पत्रिका या सर्व बाबींचे योग्य मूल्यांकन केले जाईल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन पालकांना मोबाईल संदेशाद्वारे(एसएमएस) कळविण्यात येणार आहे. शालेय शिक्षणातील शिक्षण सेवकांच्या ३ हजार ५०० जागा भरण्यात येणार आहेत. राज्यात १८० शिक्षण सेवक अतिरिक्त
ठरले होते. त्यापैकी ९० शिक्षकांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे.

दिल्लीत सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक
थकीत पगार देणार!
राज्यातील काही प्राध्यापकांचे पगार थकले होते. हे थकीत पगार देण्यासाठी केंद्र शासनाशी चर्चा करण्यात आली असून या संदर्भात थकीत पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे तावडे यांनी सांगितले. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात बंद पडलेला मराठी विभाग या शैक्षणिक वषार्पासून सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा होणार आहे त्याआधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला जाईल.

केंद्रातील मंत्री कोण हे मोदीच ठरवणार!
प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या जागेवर महाराष्ट्रातून विनय सहस्त्रबुद्धे यांनी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवतील त्यांचीच वर्णी मंत्रीपदी लागेल.

माझी विभागावर पकड!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपुर्वी अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. त्यावर एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. तुमच्या विभागातील अधिकारी बदलताना तुम्हाला विचारपूस करण्यात आाली होती का? या प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले, अधिकारी बदलत असल्याची चर्चा माझ्याशी केली होती. अधिकारी कसाही असो त्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. माझी माझ्या विभागावर पकड आहे.

शिवाजी महाराजांची सविस्तर माहिती देणार!
सातवीच्या एनसीआरटीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती केवळ सात ओळीत देण्यात आली असल्याकडे लक्ष वेधले असता तावडे म्हणाले, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती ईराणी यांच्याशी चर्चा झाली आहे. यात महाराष्ट्र सरकारचा दोष आहे. या विभागाकडूनच शिवाजी महाराजांची त्रोटक माहिती पुरविण्यात आली. जेवढी पाठविली तेवढीच पुस्तकात छापण्यात आली आहे. ज्यांच्याकडून असे झाले त्याचा शोध घेऊ व त्यांच्यावर कारवाई करू असे त्यांनी सांगितले. आता सविस्तर माहिती पाठवून ही चूक सुधारु.