आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Grained Found In Air India Air Plane News In Divya Marathi

एअर इंडियाच्या विमानात मिळाले निकामी ग्रेनेड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली, विजयनगरम - एअर इंडियामध्ये सुरक्षाविषयक त्रुटीचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात नागरी उड्डाण मंत्री आणि एअर इंडिया प्रशासनाच्या वक्तव्यात विरोधाभास आढळून आला. मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर एअर इंडियाचे दोन सुरक्षा अधिकारी निलंबित करण्यात आले असून एकूणच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईहून जेद्दाहला पोहोचलेल्या एअर इंडियाच्या विमानात निकामी ग्रेनेड आढळून आले. जेद्दाहमधील सुरक्षा अधिकाऱ्यांनी विमानाची तपासणी केली. एअर इंडियाने हे निकामी ग्रेनेड प्लास्टिक रॅपर असल्याचे सांगितले. त्यामुळे विमानाला पुढील उड्डाणाची परवानगी देण्यात आली. मात्र त्यानंतर लगेचच विमानात निकामी करण्यात आलेले ग्रेनेड होते, ही सुरक्षाविषयक गंभीर स्वरुपाचे अपयश आहे, असे नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले. त्यानंतर मुंबई आणि हैदराबादेतील दोन सुरक्षा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. याच अधिकाऱ्यांनी या विमानाला सुरक्षाविषयक प्रमाणपत्र दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी हेच विमान राखीव ठेवण्यात आले होते, असेही राजू म्हणाले. मात्र एअर इंडियाने ते चुकीचे असल्याचे सांगितले. आता या एकूणच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

तत्पूर्वी हा सर्व एनएसजीच्या सुरक्षाविषयक मॉत ड्रीलचा भाग होता, असे सांगत एअर इंडियाने हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न केला मात्र नागरी उड्डाण मंत्र्यांनी त्या प्रयत्नांवर पाणी फेरले. विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये निकामी ग्रेनेड आढळले, मात्र त्यात स्फोटके नव्हती, असे राजू यांनी विजयनगरम येथे सांगितले.

गंभीर त्रुटी
२४ ते २७ सप्टेंबर दरम्यान एनएसजीने केलेल्या सुरक्षाविषयक ड्रीलमध्ये वापरलेले हे ग्रेनेड विमानातच राहिलेले असू शकते. परंतु ही त्रुटी असल्याचे मान्य केले जाणार नाही, असे राजू म्हणाले. चालकदलाचे सदस्य आणि अधिकाऱ्यांची सक्रियता तपासून पाहण्यासाठी एनएसजीने हे ड्रील केले होते.

उशीरा शहाणपण; दोन अधिकारी निलंबित
मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर एअर इंडियाने मुंबई आणि हैदराबादेतील सुरक्षा प्रभारी अधिकारी निलंबित केले. सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करण्यासाठी समितीही स्थापन केली.
विमान मोदींसाठी राखीव नव्हते
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी राखीव ठेवण्यात आलेले बोईंगचे हे जम्बो विमान नव्हते, असे स्पष्टीकरण एअर इंडियाने दिले आहे.

जेद्दाहला गेल्यावर आढळले ग्रेनेड
मुंबईहून हैदराबाद मार्गे हे विमान शनिवारी सकाळी जेद्दाहला पोहोचले. लँडिंगच्या अगोदर बिझनेस क्लासच्या सीटवरून प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला एक बॉक्स घरंगळत आला. केबिन क्रूने तो पाहिला आणि वैमानिकाला माहिती दिली. वैमानिकाने एटीसीला माहिती दिली. विमान रिमोट बेमध्ये नेण्यास सांगण्यात आले. तेथे तपासणीत ग्रेनेड आढळले मात्र त्यात स्फोटके नव्हती.