आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Greater Noida: Four Detained For Murder Of BJP Leader Vijay Pandit

उत्तर प्रदेशातील भाजप नेत्याच्या हत्येचा सपाच्या नेत्यावर आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रेटर नोएडा - उत्तर प्रदेशातील दादरीमधील भाजप नेते विजय पंडित यांच्या हत्येचे प्रकरण राजकीय वळण घेऊ लागले आहे. विजय यांच्या पत्नी गीता पंडित यांनी या हत्येसाठी समाजवादी पक्षाचे माजी खासदार नरेंद्र भाटी, अनिल दुजाना आणि विक्रम ठेकेदार यांनी जबाबदार धरले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या गृहसचिवांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे या प्रकरणाचा अहवाल सादर केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात हे तिघेही विजयला फोनवर धमक्या देत होते. डॉक्टरांचा (डॉ. महेश शर्मा) प्रचार केला, तर मारून टाकू अशी धमकी अनिलने त्यांना फोनवर दिली होती. तो तुरुंगातून बोलत असल्याचे त्याने सांगितले होते. नंतर नरेंद्र भाटी यांचाही धमकीचा फोन आला होता, असा आरोप गीता पंडित यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत महेश शर्मा हे गौतम बुद्धनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. त्यांचाच या निवडणुकीत विजय झाला. त्यांच्या विरोधात सपाचे नरेंद्र भाटी मैदानात होते.

उत्तर प्रदेशात कायदा- सुव्यवस्थेचे धिंडवडे, केंद्र कारवाई करणार?
गेल्या काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती पूर्णत: नियंत्रणाबाहेर गेली असून बलात्काराच्या अनेक घटनांमुळे उत्तर प्रदेश हादरून गेले आहे. बदायूंमध्ये दोन बहिणींवर बलात्कार करून त्यांचे मृतदेह झाडाला लटकवलेले आढळून आल्यानंतर मुख्यमंत्री राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी बसपच्या नेत्या मायावती यांनी केली होती. त्यातच विजय पंडित यांच्या हत्येचे प्रकरण घडले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून हस्तक्षेप केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजनाथसिंहांकडे सोपवला अहवाल
विजय पंडित यांच्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. उत्तर प्रदेशच्या गृहसचिवांना या संदर्भातील अहवाल तातडीने मागवण्यात आला असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे राज्यातील स्थितीचा अहवाल सादर केला आहे.

पोलिसांचे संगनमत
गीता पंडित यांनी पोलिसांवरही संगनमताचा आरोप केला आहे. विजय पंडित यांनी धमकीची लेखी तक्रार केली होती; परंतु पोलिसांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही. पोलिसांचे या प्रकरणात संगनमत आहे, असे त्या म्हणाल्या.

माझा संबंध नाही
माजी खासदार नरेंद्र भाटी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. दादरीमध्ये आधीही रंगदारीच्या नावावर खून होत आले आहेत. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, असे नरेंद्र भाटी यांनी म्हटले आहे.

चार संशयितांना अटक
पोलिसांनी विजय पंडित हत्या प्रकरणात चार संशयितांना अटक केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था स्थिती अबाधित राखण्यासाठी गौतम बुद्धनगर जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

सीबीआय चौकशी करा : भाजप
पंडित यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी भाजप सर्मथकांनी जोरदार निदर्शने केली. अंत्ययात्रेदरम्यान संतप्त जमावाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 19 वर पार्थिव ठेवून रास्ता रोको केला. भाजपचे खासदार महेश शर्माही त्या वेळी उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. 48 तासांत आरोपींना अटक झाली नाही, तर आंदोलन पुकारू आणि सोमवारी संसदेत हा विषय लावून धरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.