आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी सोमवारी येणार लोकसभेत; भाजपचा व्हीप जारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राज्यसभेत मंजुरीनंतर महत्त्वाचे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक पुन्हा एकदा लोकसभेत आठ ऑगस्ट रोजी सादर करण्यात येणार आहे. लोकसभेत हे विधेयक सहज पास होणार असले तरी खबरदारी म्हणून भाजपच्या वतीने आपल्या खासदारांना व्हीप जारी करण्यात आला अाहे. यानुसार आठ आॅगस्ट रोजी भाजपच्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहावे लागणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले हे विधेयक बुधवारी उशिरा राज्यसभेत मंजूर झाले आहे.

सध्या ९ राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, यामध्ये गुजरात, आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, महाराष्ट्र आणि गोवा यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त चार राज्यांमध्ये भाजपचे इतर पक्षांसोबत सरकारमध्ये आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, नागालँड, पंजाब, जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. म्हणजेच देशातील एकूण १३ राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. या राज्यांमध्ये त्याला मंजूरी मिळणे अधिक सोपे जाणार आहे. जीएसटी लागू करण्यासाठी त्याला १६ राज्यांची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी बिहार आणि पश्चिम बंगालने आधीच समर्थन देणार असल्याचे जाहीर केले आहे. तशी चर्चादेखील तेथील सरकारसोबत झालेली आहे.

या संदर्भात चर्चा करण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवलेली आहे. ही बैठक २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. जीएसटी हाच या बैठकीतील मुख्य विषय असणार आहे. यामध्ये सर्वांनी या संविधान संशोधन बिलाला अनुमोदन द्यावे, असा आग्रह करण्यात येणार आहे. त्याच बरोबर सर्वसामान्य लोकांशी जोडलेल्या योजना कार्यान्वित करण्यासह सरकारशी संबंधित इतर मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच २३ आॅगस्ट रोजी दिल्लीमध्ये सर्व राज्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकदेखील बोलावण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...