नवी दिल्ली /चेन्नई /तिरुपती - आंध्र प्रदेशात चित्तूर जिल्ह्यात पोलिस गोळीबारात मारल्या गेलेल्या २० चंदन तस्करांचे "एन्काउंटर प्रकरण' गंभीर रूप धारण करत आहे. आंध्र प्रदेश व तामिळनाडूत दुसर्या दिवशी त्याचे तीव्र पडसाद उमटले असून तणाव निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारकडे घटनेचा अहवाल मागितला आहे.
गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर गृहमंत्र्यांनी आंध्र प्रदेश सरकारकडे यासंदर्भात सविस्तर अहवाल मागितला आहे. चित्तूर जिल्ह्यात शेषाचलम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत २० संशयित चंदन तस्कर मारले गेले होते. पैकी १२ जण तामिळनाडूचे होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात चंदन व शस्त्रास्त्रे होती.