नवी दिल्ली/ गुडगाव - रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी 7 वर्षांच्या मुलाची हत्या झाली होती. त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. डॉक्टरांच्या टीममधील डॉ. दीपक माथूर म्हणाले, मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळून आले नाही. त्याच्या गळ्यावर चाकूचे दोन वार होते. दरम्यान, आरोपी अशोकची चौकशी पूर्ण झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याने खून केल्याचे कबूल केले असल्याचे पोलिस आयुक्त बिरमजीत सिंह यांनी सांगितले. गुडगावमधील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी (8 सप्टेंबर) सकाळी शाळेच्या टॉयलेटमध्ये दुसरीतील मुलाचा मृतदेह सापडला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. रेयान ग्रुपच्या देशभरात 130 पेक्षा जास्त शाळा आहेत.
पोस्टमॉर्टम आणि पोलिस तपासात काय समोर आले...
- डॉक्टर म्हणाले, मुलाच्या गळ्यावर चाकूचे निशाण होते.
- त्याआधी पोलिस आयुक्त सिंह म्हणाले, 'बस कंडक्टर अशोकने गुन्हा कबूल केला आहे. हत्येत दुसरा कोणीही सहभागी नव्हता. पोलिसांची चौकशी पूर्ण झाली आहे. मुलाची हत्या अशोकनेच केली असल्याचे सिद्ध होत आहे. अशोक आधीच टॉयलेटमध्ये होता. त्यानेच मुलाचा खून केला. शाळेची या प्रकरणातील भूमिका हा वेगळा विषय आहे.'
काय आहे प्रकरण
- गुडगाव येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वर्षांच्या मुलाचा शाळेच्या टॉयलेटमध्ये मृतदेह सापडला होता. हत्याच्या आरोपात शुक्रवारी सायंकाळीच शाळेचा बस कंडक्टर अशोक कुमारला अटक करण्यात आले होते. आरोपी अशोक 8 महिन्यांपूर्वीच शाळेत कामाला लागला होता.
- अशोकने माध्यमांना सांगितले की माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी टॉयलेटमध्ये चुकीचे काम करत होतो. ते मुलाने पाहिले आणि मग मी त्याला धक्का दिला. नंतर आत ओढले. तर तो ओरडाओरड करायला लागला. त्यामुळे घाबरून मी चाकूने त्याचा गळा चिरला.
- मुलाच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.