आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील मुस्लिमांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना; निवृत्तीच्या दिवशी हमीद अन्सारींचे भाष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांचा कार्यकाळ गुरुवारी संपुष्टात येत आहे. - Divya Marathi
उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांचा कार्यकाळ गुरुवारी संपुष्टात येत आहे.
नवी दिल्ली- देशातील मुस्लिमांमध्ये सध्या असुरक्षिततेची भावना घर करत असून ते प्रचंड अस्वस्थ आहेत... हे वक्तव्य आहे मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे. गेल्या दहा वर्षांपासून उपरराष्ट्रपतिपदी राहिलेले अन्सारी यांचा कार्यकाळ गुरुवारी समाप्त झाला. ८० वर्षीय अन्सारी यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटच्या दिवशी अल्पसंख्याकांचा मुद्दा उपस्थित करून सरकारवर टीकास्त्र सोडले. एवढ्यावरच अन्सारी थांबले नाहीत. ‘अल्पसंख्याकांना किती सुरक्षितता मिळालेली आहे यावरच लोकशाहीची ओळख निर्माण होत असते,’ असेही अन्सारी म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यांनी नवा राजकीय वाद निर्माण झाला असून याचे वेगवेगळे अर्थ काढले जात अाहेत. अन्सारी यांच्या जागी शुक्रवारी भाजप नेते व्यंकय्या नायडू नवे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. अन्सारींच्या वक्तव्यांमुळे वाद पेटला आहे.

राजकारणात ‘३’सी काढून ‘४’सी आणणे आवश्यक - नायडू
राजकारणात दुर्दैवाने ‘३सी’ अर्थात कॅश, कास्ट व कम्युनिटीचाच बोलबाला आहे. याऐवजी चरित्र, क्षमता, दक्षता आणि आचारण या ‘४सी’ असायला हव्यात. विविधतेतून एकता हेच भारताचे वैशिष्ट असल्याचे व्यंकय्या नायडू म्हणाले.

मोदींचा टोला : आता तुम्ही तुमच्या मूळ विचारांनुसार कार्य करू शकाल
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘अन्सारी भारतीय प्रशासनात मुत्सद्दी राहिलेले आहेत. या लोकांचे हसणे किंवा हाताता हात देणे याचा अर्थ लगेच कळू शकत नाही. दहा वर्षांत हे कौशल्य नक्कीच वापरात आले असेल. बरीच वर्षे अन्सारी पश्चिम आशियात मुत्सद्दी म्हणून राहिले. मात्र, १० वर्षे त्यांच्यावर वेगळी जबाबदारी होती. क्षणोक्षणी राज्यघटनेच्या कक्षेत राहावे लागत होते. त्यामुळे साहजिकच आपल्याला थोडे अस्वस्थ वाटलेही असेल. आता तुम्हाला तुमच्या मूळ विचारांनुसार काम करण्याची संधी मिळेल.’
 
 
हिंदू मुस्लिमांचे खरे मित्र - भाजप
यावर भाजपचे नेते शाहनवाज हुसैन यांनी समोर येऊन प्रतिक्रिया दिली. भारतात मुस्लिमांचे खरे मित्र मुस्लिम आहेत. तसेच मुस्लिमांना राहण्यासाठी भारताशिवाय चांगला देश कुठलाही नाही असे त्यांनी सांगितले आहे.
 
जीतेंद्र आव्हाडांनी केले समर्थन
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी मावळते उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्या वक्त्यव्यांचे समर्थन केले आहे. 
- गेल्या तीन वर्षांत गोरक्षकांचे हल्ले आणि बीफ बंदीसह विविध प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे, देशातील मुस्लिम, दलित अल्पसंख्याक समाजात भितीचे वातावरण आहे असे आव्हाड यांनी सांगितले आहे.
 
नेमके काय म्हणाले अन्सारी?
- उपराष्ट्रपती पदाच्या दुसऱ्या कार्यकाळाला निरोप देताना हामिद अन्सारी यांनी राज्यसभा टीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मोदी सरकारला सुनावल्याचे म्हटले जात आहे.
- अन्सारी म्हणाले, "खरंच आज देशातील अल्पसंख्याक समुदायाच्या मनात असुरक्षितता आणि भिती आहे. देशभरात विविध ठिकाणी ह्या गोष्टी ऐकल्या जाऊ शकतात. कित्येक शतकांपासून भारतीय समाज सर्वांना स्वीकारणारा आणि सर्वसमावेश आहे. मात्र, आता हे वातावरण बदलत आहे. भारतीय नागरिकांच्या चक्क भारतीय होण्यावरच सवाल उपस्थित करण्याची प्रवृत्ती अतिशय चिंताजनक आहे."
- "अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्यांवर हल्ले करून त्यांना ठार मारणे, कथित घरवापसी अशा प्रकारच्या वाढत्या घटना भारतीय मूल्य ढासळण्याचे काम करत आहेत. यातून कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची प्रशासनाची क्षमता सुद्धा कमी झाल्याचे दिसून येत आहे." 
- देशातील हे प्रश्न आपण वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारसमोर मांडले आहेत असेही त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...