आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राह्मणांसह सर्वच जातींना आरक्षण द्या, हरिभाऊ राठोड यांचे नवे अभियान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील जातिभेद नष्ट करायचा असेल तर सर्वच समाजाला त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण द्यावे. त्यात ब्राह्मणांसह मराठा, अल्पसंख्याक आदी सर्वांचाच समावेश असावा यासाठी आपला यापुढे लढा यापुढे असेल, असे अखिल भारतीय बंजारा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार हरिभाऊ राठोड यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
राठोड म्हणाले, स्वातंत्र्यानंतर घटनेने अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग इत्यादी प्रवर्गात मोडणाऱ्या समाजास त्यांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक दर्जा उंचावावा यासाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. परंतु प्रत्येक प्रवर्गातील जातीनिहाय पाहिले तर त्यातील मोजक्याच जातींना या आरक्षणाचा लाभ झालेला अाहे. उर्वरित अतिमागास जाती होत्या त्याच अवस्थेत अद्यापही आहेत.
देशातील विमुक्त आणि भटक्या समाजाच्या ६६६ जाती, तसेच जवळपास ५४० अतिमागास जातींना ओबीसींना लागू असलेल्या २७ टक्के आरक्षणाचा कुठलाही लाभ मिळत नाही. हाच आधार घेत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग दिल्ली यांनी मार्च २०१४ मध्ये ज्या शिफारशी केल्या आहेत. त्यानुसार ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणातही भटक्या विमुक्त, अतिमागास आणि मागास असे वर्गीकरण व्हावे असे सुचविले आहे. या शिफारशी लागू व्हाव्यात यासाठी दल्लीत महारॅलीचे आयोजनाची तयारी करीत असल्याचे राठोड यांनी सांगितले. अाेबीसींप्रमाणेच अनुसूचित जाती व जमातीमध्येसुध्दा काही जातींनाच सातत्याने आरक्षणाचा लाभ मिळत गेला आहे तर त्या वर्गवारीतील अत्यंत मागास जाती अद्यापही मुख्य प्रवाहात आलेल्या नाहीत. या समुदायांमध्येही जातीनिहाय आरक्षण देऊन उपेक्षितांना मदतीचा हात मिळावा यासाठी देशव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे.
अजूनही जातिभेद कायम...
राठोड यांनी मागासवर्गीयांच्या आरक्षणामुळे अद्यापही जातीय भेदभाव मिटत नसल्याकडे लक्ष वेधले; ज्या जाती सवर्ण म्हणून गणल्या जातात त्यांनाही त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण द्यावे. १०० टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार जोपर्यंत निती तयार करीत नाही तोपर्यंत या देशातील भेदभाव दूर होऊ शकत नाही. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागणी करीत असल्याचेही राठोड यांनी सांगितले.