नवी दिल्ली - सिगारेट पाकिटाच्या दोन्ही बाजूस ८५ टक्के "आरोग्यास धोकादायक' असा वैधानिक इशारा प्रकाशित करण्यावरून सुरू असलेल्या वादात पंतप्रधान कार्यालयाने हस्तक्षेप केल्यानंतर आता मधला मार्ग निघण्याचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत. इशारेवजा चित्राचे प्रमाण ८५ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांवर आणण्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा विचार आहे.
या मुद्द्यावरून आरोग्य मंत्रालय आणि संसदेच्या ऑन सबऑर्डिनेट लेजिस्लेशन समितीत वाद सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका उच्चपदस्थ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, सिगारेटच्या पाकिटावरील इशारावजा चित्र ८५ वरून ६५ टक्क्यांवर आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.
वास्तविक, चित्राचे प्रमाण ४० टक्क्यांवरून थेट दुप्पट करण्याच्या मुद्द्यावरूनच संसदीय समितीचा या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या बैठकांत विरोध होता. हे प्रमाण थेट वाढवता ते हळूहळू वाढवण्यात यावे, अशी समितीची शिफारस होती. मात्र, मंत्रालयाचा त्यावर आक्षेप होता. या प्रकरणात पंतप्रधान कार्यालयाने हस्तक्षेप केल्यामुळे आता मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
मंत्रालयास अहवाल सुपूर्द
याप्रकरणाशी संबंधित अन्य एका वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, ऑन सब ऑर्डिनेट लेजिस्लेशन समितीने याबाबतचा अहवाल आरोग्य मंत्रालयाला सुपूर्द केला आहे. मात्र, त्याला अंतरिम स्वरूप देण्यापूर्वी आरोग्य मंत्रालयाशी अंतिम चर्चा बाकी आहे. जगभरात अशा वैधानिक इशार्याचे चित्र हळूहळू मोठे केले जात आहे, असे समितीने शेवटच्या बैठकीत सांगितले होते. त्यामुळे भारतातही हाच फॉर्म्युला वापरला जावा, असे बहुतांश सदस्यांचे मत आहे. आगामी बैठकांमध्ये यावर सहमती बनू शकते.
ऑक्टोबरमध्ये जारी झाली अधिसूचना
१५ऑक्टोबर २०१४ रोजी जारी अधिसूचनेनुसार एप्रिल २०१५ पासून सर्व सिगारेट पाकिटांवर नवा इशारा लागू होणार होता. मात्र, संसदीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हा इशारा लागू करण्याची मुदत सध्या पुढे ढकलली आहे. त्यामुळे नव्या अधिसूचनेची वाट आहे.
डॉ. हर्षवर्धन यांचा आक्रमक पवित्रा
माजीआरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे तंबाखूविरोधातील त्यांचे अभियान कायम ठेवत सिगारेट पाकिटावरील चित्राचे सध्याचे प्रमाण बदलू इच्छित होते. याबाबतच्या त्यांच्या आदेशानंतरच पाकिटावर सध्यापेक्षा दुप्पट आकाराचा इशारा प्रकाशित करण्याचा निर्णय झाला. मात्र, जेपी नड्डा यांनी आरोग्य मंत्रालयाचा कारभार हाती घेताच तंबाखू लॉबीने मंत्रालयावर दबाव बनवायला सुरुवात केली.
तंबाखू लॉबीचा डाव
विद्यमानआरोग्यमंत्री जेपी नड्डा यांच्यावर तंबाखू लॉबीने चांगलाच दबाव टाकला आहे. इशारेवजा चित्राचा निर्णय अनेक महिन्यांपर्यंत थंडबस्त्यात ठेवण्यासाठी याप्रकरणी मंत्रिसमूहाची स्थापनाही करण्यात आली होती. यावरूनच या लॉबीचा प्रभाव दिसू येतो. दरम्यान, २०१३ मध्ये जारी करण्यात आलेले इशारेवजा चित्र ब्रिटनच्या फुटबॉल संघाच्या कर्णधारांच्या चेहर्याशी मिळतेजुळते असल्याचा अजब तर्क लावत तो हटवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यात तितके यश येऊ शकले नाही.