नवी दिल्ली - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ई-रिक्षा उत्पादन क्षेत्रातील हितसंबंधीयांचे हित साधण्यासाठीच बॅटरीवर चालणार्या ई-रिक्षांना परवानगी देण्यात आली असून गडकरी यांच्याशी संबंधित पूर्ती ग्रीन टेक्नॉलॉजी या ई- रिक्षांचे उत्पादन करणार्या कंपनीच्या फायद्यासाठीच या रिक्षांवरील बंदी उठवण्यात आल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. मात्र, आपले या व्यवसायाशी कोणतेच हितसंबंध नसल्याचा खुलासा गडकरी यांनी केला असून हे आरोप फेटाळले आहेत.
माध्यमांनी दिलेल्या बातम्यांत म्हटले आहे की, गडकरी यांच्याशी संबंधित पूर्ती ग्रीन टेक्नॉलॉजी ही कंपनी ई-रिक्षा तयार करते. या कंपनीला फायदा मिळावा म्हणूनच गडकरी या रिक्षांवरील बंदी हटवू पाहत आहेत. गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत धरणे आंदोलन करणार्या चालकांची भेट घेतली होती. त्या वेळी बंदी हटवण्यासाठी सरकारतर्फे कायद्यात दुरुस्तीचे आश्वासन दिले होते.
गडकरी यांचे मेहुणे आणि पूर्ती ग्रीन टेक्नॉलॉजीचे संचालक राजेश तोतडे यांचा हवाला देऊन माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. ई-रिक्षांचे उत्पादन सुरू करण्यासाठी कंपनी कायद्यामध्ये दुरुस्ती होण्याची प्रतीक्षा करत आहे, असे तोताडे यांनी म्हटले आहे. गडकरी यांनीच पूर्ती समूहाची स्थापना केली होती. 2011 पर्यंत ते या उद्योग समूहाचे अध्यक्षही होते.
गडकरी हे कलियुगातील मसिहा : काँग्रेस
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कलियुगातील मसिहा आहेत. गरिबातील गरीब माणूस कोट्यधीश व्हावा, हे त्यांचे स्वप्न असून त्याच्या ‘पूर्ती’साठी ते अहोरात्र झटत असतात, अशी उपरोधिक टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
‘पूर्ती’शी संबंध नाही : गडकरी
गडकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा ई-रिक्षा निर्मिती करणार्या कंपनीशी कोणताही संबंध नाही किंवा या क्षेत्रात गडकरी यांचे कोणतेही हितसंबंध गुंतलेले नाहीत, असे गडकरी यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. ज्या कंपन्यांना सीएसआयआरने परवाना दिलेला आहे, त्यांनाच ई-रिक्षा निर्मितीची परवानगी देण्यात आल्याचे गडकरींनी म्हटले आहे.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)