आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पायल अब्दुल्ला यांनी सन्मानाने बंगला सोडावा, उच्च न्यायालयाचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आेमर अब्दुल्ला यांच्या माजी पत्नी पायल अब्दुल्ला यांनी सन्मानपूर्वक सरकारी बंगला सोडावा, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. सरकारी बंगल्यात दोन मुलांसह पायल राहतात.

“तुम्ही सन्मानपूर्वक बंगला खाली करणार की नाही ? की आम्ही आदेश काढावा ?’ असे न्यायमूर्ती इंदरमित कौर यांनी सुनावणीदरम्यान विचारले. निवृत्तीनंतर प्रत्येक व्यक्तीला सरकारी कार्यालय सोडावे लागते. दुसरीकडे दिल्ली पोलिस पायल व त्यांच्या मुलांना झेड व झेड प्लस सुरक्षा पुरवतील. दिल्लीत असताना त्यांना ही सुरक्षा दिली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. १६ ऑगस्ट राेजी झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने पायल यांना निवासस्थान सोडण्यास सांगितले.

१९९९ पासून पायल ७, अकबर रोड येथील बंगल्यात राहतात. हा बंगला सोडण्यास त्यांनी नकार दिला आहे. माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याने तूर्त बंगला सोडू शकत नाही. सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी, अशी विनंती पायल यांनी न्यायालयाकडे केली होती. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी बंगला ताब्यात ठेवता येऊ शकत नाही, असे सांगून केंद्र सरकारने पायल यांची सुरक्षिततेची सबब नाकारली होती. कारण पायल यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा विषय दिल्ली पोलिसांच्या अखत्यारीतील आहे. दिल्ली पोलिस त्यांची सुरक्षा करतील. त्यात काहीही कपात करण्यात आलेली नाही, असे केंद्राचे वकील अनुराग अहलुवालिया यांनी सांगितले. प्रियंका गांधी, सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह अनेक नेत्यांना सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी बंगल्यात राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, याकडे पायल यांनी याचिकेद्वारे लक्ष वेधले आहे.

बंगला ताब्यात घ्यावा : आेमर अब्दुल्ला
अनेक वर्षांपासून मी बंगल्यात राहत नाही. त्यामुळे प्रशासनाने बंगला व परिसर ताब्यात घ्यायला हवा, असे आेमर अब्दुल्ला यांच्या वतीने सांगण्यात आले.

सुरक्षेवरून वाद
पायल अब्दुल्ला यांच्या सुरक्षेवरून वाद आहे. काश्मीरच्या तुलनेत दिल्लीत त्यांना किंवा कुटुंबीयांना फार काही धोका असल्याचे दिसून येत नाही. तशा प्रकारची गोपनीय माहितीदेखील उपलब्ध नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...