आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विमा : खर्च घटवण्यावर भर, प्रीमियमवर परीक्षणाच्या पर्यायाबाबत इर्डाशी चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आरोग्य विम्यासाठी येणार्‍या खर्चात वाढ झाल्याने सर्वसाधारण विमा कंपन्या हा खर्च कमी करण्याच्या उपायासाठी सरसावल्या आहेत. क्लेमवर आधारित अनुभव आणि प्रीमियमवर समीक्षा यासह इतर पर्यायांबाबत या कंपन्यांची विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाशी (इर्डा) चर्चा सुरू आहे.
सर्वसाधारण विमा कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या जनरल इन्शुरन्स कौंसिलचे (जीआयसी) महासचिव एम. चंद्रशेखरन यांनी सांगितले, आरोग्य विम्यासाठी येणार्‍या खर्चात दरवर्षी 15 ते 20 टक्के वाढ होत आहे. या शिवाय तांत्रिक पातळीवर नव्या शस्त्रक्रियांसाठीची प्रक्रियाही महाग होत आहे. या वाढत्या खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकल्यास आरोग्य विम्याची उत्पादने आर्थिकदृष्ट्या महागडी ठरत आहेत. अशा स्थितीत हा खर्च कमी करण्यासंदर्भात संघटनेची इर्डाशी चर्चा सुरू आहे. यात सध्याच्या क्लेमच्या अनुभवांवर आधारित प्रीमियमसंदर्भात समीक्षण करण्याच्या पर्यायाचाही समावेश आहे. नुकसानीपासून वाचण्यासाठी आरोग्य विमा क्षेत्रातील कंपन्यांना कोणता तरी मार्ग काढावाच लागणार आहे. इर्डाशी होणार्‍या चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल अशी आशा चंद्रशेखर यांनी व्यक्त केली. खासगी क्षेत्रातील साधारण विमा कंपनी भारती एक्सा जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ डॉ. अमरनाथ अनंतनारायण यांच्या मते, या मुद्द्यावर सर्व साधारण विमा कंपन्यांच्या प्रमुखांची बैठक झाली आहे. आरोग्य विम्यासाठी येणार्‍या खर्चात कपातीबाबत यात चर्चा झाली.

खर्च नियंत्रणासाठी प्रयत्न
बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्सचे प्रमुख सुरेश सुगाथन यांच्या मते, आरोग्य विमावरील वाढत्या खर्चाला लगाम लागण्यासाठी साधारण विमा कंपन्या रुग्णालयांचे एक पॅनल तयार करून शुल्काबाबत काय तडजोड करता येईल याचा विचार करत आहेत. सध्या कंपन्या आपापले स्वत:चे पॅनल तयार करून काम करत आहेत.