आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांना २५ हजार रुपयांचा दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. राजधानीतील डेंग्यू आणि चिकुनगुन्याची साथ नियंत्रणात आणण्यासाठी अधिकारी सहकार्य करत नसल्याचा आरोप जैन यांनी केला होता. त्यावर या अधिकाऱ्यांची नावे प्रतिज्ञापत्राद्वारे उघड करावीत, असे न्यायालयाने त्यांना सांगितले होते. हे प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याने न्यायालयाने जैन यांना दंड ठोठावला आहे.

जैन यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे जैन यांनी ४ ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असा आदेश न्यायमूर्ती एम. बी. लोकूर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला. जैन यांची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ चिराग उदय सिंग म्हणाले की, जैन मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करतील. आम्हाला २४ तास द्या. त्यावर न्यायालयाने, ‘लोक मरत असताना तुम्हाला २४ तासांची गरज नाही,’ अशी टिप्पणी केली. साॅलिसिटर जनरल रणजितकुमार यांनी दिल्लीच्या आरोग्य सचिवांतर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची परवानगी मागितली. खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी आता मंगळवारी ठेवली आहे.

राजधानीत गेल्या वर्षी एका ७ वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. पाच रुग्णालयांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला होता, असा आरोप होता. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या पालकांनी आत्महत्या केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणात दिल्ली सरकारकडून उत्तर मागितले होते. दिल्ली सरकार साथीचे रोग रोखण्यासाठी कोणती पावले उचलत आहे? अशी विचारणा न्यायालयाने २६ सप्टेंबरला केली होती. त्यावर प्रतिज्ञापत्र दाखल करताना जैन यांनी ‘अधिकारी सहकार्य करत नाहीत तसेच डेंग्यू आणि चिकुनगुन्यासारख्या रोगांना प्रतिबंध घालण्याची जबाबदारी घेत नाहीत,’ असा आरोप केला होता. जैन यांच्या या आरोपाला न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला होता आणि ३ ऑक्टोबरपर्यंत या अधिकाऱ्यांची नावे द्यावीत तसेच पुरावे सादर करावेत, असा आदेश जैन यांना दिला होता.
बातम्या आणखी आहेत...