आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालविकासासाठी सढळ हस्ते मदत करावी - सत्यार्थी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगभरातील १४ नोबेल पुरस्कार विजेत्यांनी संयुक्त राष्ट्रांना बालविकासासाठी साकडे घातले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने बालविकास व संरक्षणासाठी सढळ हस्ते मदत करावी, अशी मागणी भारतातील नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. शिक्षण, बाल शोषण, बालकांविरुद्ध होणारी हिंसा रोखण्यासाठी गुंतवणूक वाढवण्याची निकड असल्याचे मत नोबेल पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केले.

नॉर्वे येथे होणा-या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या आदल्या दिवशी हे संयुक्त निवेदन सादर करण्यात आले. बालकांप्रती राजकीय उत्तरदायित्व वाढवण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राजकारणाच्या अजेंड्यावर बालविकास असला पाहिजे यावर परिषदेत चर्चा होणार आहे. शिक्षणाचा अधिकार, शोषणमुक्त समाज आणि बालकांविरुद्ध हिंसा रोखण्यासाठीच्या कृती कार्यक्रम परिषदेत निश्चित होईल.

बालकांसाठी आणीबाणीची परिस्थिती, सत्यार्थींचा पुढाकार : बालहक्कांसाठी काम करणारे कैलाश सत्यार्थी यांना वर्ष २०१४ मध्ये शांततेचे नोबेल प्रदान करण्यात आले. बालकांसाठी ही आणीबाणीची परिस्थिती आहे. वेळीच त्यांच्या सर्वांगीण विकासाचा निधी वाढवावा, असे आवाहन सत्यार्थींनी केले आहे. जगात सध्या १६८ दशलक्ष बालके बालमजूर म्हणून राबत आहेत. ५.५ दशलक्ष गुलामी करत आहेत. शिवाय मानवी तस्करी आणि शोषणाचेही ते बळी अाहेत. त्यांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रयत्न करण्याची गरज आहे.

निवेदनावर यांच्या स्वाक्ष-या
सर्व नोबेल पुरस्कार विजेत्यांनी संयुक्त निवेदन देण्याची ही पहिलीच घटना आहे. यांना एकत्र आणण्याचे श्रेय कैलाश सत्यार्थींनाच द्यावे लागेल. विविध श्रेणीतील नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत. विल्यम इ. मॉर्नर (रसायनशास्त्र),ब्रायन श्चमीड(भौतिकशास्त्र), जॅक शझोस्तक,टॉर्सस्टन विसेल (मानसशास्त्र) यांनी या संयुक्त निवेदनासाठी प्रामुख्याने पुढाकार घेतला.