आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hemant Soren Become Jharkhand New Chief Minister, Sonia Gandhi Spoke To Mukti Morcha

हेमंत सोरेन होणार झारखंडचे नवे मुख्‍यमंत्री, सोनिया गांधींची मुक्ती मोर्चाशी बोलणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - झारखंडमध्ये आघाडी सरकारची स्थापना आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी झारखंड मुक्ती मोर्चाशी (झामुमो) बोलणी अंतिम टप्प्यात आल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ए. के. अँटनी यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक घेऊन सल्लामसलत केली. नव्या सरकारमध्ये झामुमोचे अध्यक्ष शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.


केंद्रीय संरक्षणमंत्री अँटनी हे आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांशी युती करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपगटाचे अध्यक्ष आहेत. काँग्रेस सरचिटणीस शकील अहमद, झारखंड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुखदेव भगत आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते राजेंद्र सिंग यांनी बुधवारी सकाळी सोनिया गांधी यांची भेट घेऊन झारखंडमध्ये झामुमोशी झालेल्या बोलणीतील प्रगतीची माहिती दिली. तत्पूर्वी भगत, सिंग आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सरफराज अहमद यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. राजद झारखंडमधील नव्या सरकारला पाठिंबा देईल याबाबत आपणास शंभर टक्के खात्री असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.


अशी ठरली तडजोड
हेमंत सोरेन यांचेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित मानले जात आहे. त्याबदल्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यातील 14 मतदारसंघ सोडण्यास झामुमो तयार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.


नवे सरकार उपमुख्यमंत्र्याविनाच!
झारखंडमधील नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री हे पदच असणार नाही. काँग्रेस या सरकारमध्ये सहभागी होत आहे. काँग्रेसकडे 5 महत्त्वाची मंत्रिपदे दिली जाणार आहेत.