आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान सरहद्दीवर भारत उभारणार हायटेक कुंपण, गृहमंत्र्यांनी केली होती पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान सीमेवरील पंजाब आणि जम्मूच्या अतिसंवेदनशील भागांत इस्रायलप्रमाणेच अतिसुरक्षित आणि अद्ययावत कुंपण घालण्याचा सरकारचा विचार आहे. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी केंद्र सरकार या योजनेवर सध्या विचार करत आहे. जैश ए मोहंमदच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी करत पठाणकोट हवाई तळावर हल्ला चढवला होता. त्यानंतर केंद्राच्या अनेक बैठकीत घुसखोरी थांबवण्यासाठी चर्चा झालेली आहे. यात गृहमंत्री राजनाथ सिंहांसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हेसुद्धा उपस्थित होते. इस्रायलप्रमाणेच बॉर्डर गार्डिंग मॅकेनिझमच्या शक्यतेवर विचार करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह स्वत: २०१४ मध्ये इस्रायलच्या सीमेवर गेले होते. हे तंत्रज्ञान भारताला देऊ, असा शब्द त्यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी सिंह यांना दिला होता. दरम्यान, हंगेरी आणि बुल्गारियाने निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी इस्त्रायलकडून हे सुरक्षा तंत्रज्ञान मागितले होते. शिवाय, भारतासह अमेरिका अाणि अन्य राष्ट्रांच्या शिष्टमंडळांनी हे तंत्रज्ञान इस्त्रायलकडून माहिती करून घेतले आहे.
लोखंडी भिंतीने संरक्षण
वेस्ट बँक, गाझा आणि इजिप्तकडील सीमारेषेवर इस्रायलने लोखंडी भिंती उभारल्या असून त्यावर काटेरी तार बसवले आहेत. घुसखोरीचा प्रयत्न होताच चौक्यांवर बसवलेले इलेक्ट्रॉनिक यंत्र संदेश पाठवतात. त्यामुळे लष्कर सक्रिय होतात. कुंपण लागू करणे शक्य नसलेल्या भागांत लहान आकाराचे मानवरहित विमान सुरक्षेसाठी वापरले जाते. शिवाय, प्रत्येक चौक्यांसाठी स्वयंपूर्ण युनिट उपलब्ध करून दिले आहेत.
मनुष्यावर नव्हे तंत्रज्ञानावर इस्रायलचा विश्वास : इस्रायलचे सीमा सुरक्षा तंत्रज्ञानात जगात सर्वोत्तम मानले जाते. या सीमेवर लांब अंतरावरील छायाचित्र घेऊ शकणारे कॅमेरे बसवण्यात आले असून रात्रीच्या अंधारात थर्मल इमेजिंग सिस्टिम लागू करण्यात आली आहे. रडार, इलेक्ट्रॉनिक टच आणि मोशन सेन्सरसोबतच सुरूंग बनवणारे भूमिगत सेन्सरही लावले आहेत.