आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच वर्षांचा उच्चांक; ठोक महागाई दर 5.25 टक्क्यांवर, भाजीपाला, फळांचे दर वाढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जानेवारी महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर डिसेंबर महिन्याच्या तुलनेत ५.२५ टक्के वाढला आहे. डिसेंबरमध्ये हा आकडा ३.३९ टक्क्यांवर होता. जानेवारी महिन्यात अन्नधान्य, खाद्यपदार्थांच्या वस्तू आणि उत्पादित मालाच्या वस्तूंच्या महागाई दरात वाढ करण्यात आली. या व्यतिरिक्त भाजीपाला आणि फळांचे दरही वाढले आहेत.    
जानेवारी महिन्यात खाद्यपदार्थांच्या महागाईमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. जानेवारीत खाद्यपदार्थांची महागाई -०.५६ टक्क्यांवर पोहोचली. डिसेंबर महिन्यात हा आकडा शून्यापेक्षा कमीवर म्हणजेच -०.७० टक्क्यांवर होता. जानेवारी महिन्यात फळांच्या घाऊक किमतीमध्ये वाढ नोंदवण्यात आली. फळांची महागाई ३.५८ टक्क्यांवर पोहोचली तर डिसेंबरमध्ये हा आकडा ०.०४ टक्क्यांवर होता. दुसरीकडे भाजीपाल्याची महागाई जानेवारीमध्ये शून्यपेक्षा कमी -३२.३२ टक्क्यांवर होती. एक महिन्यात हा आकडा -३३.११ टक्क्यांवर होता. दरम्यान औद्योगिक क्षेत्रामध्ये सध्या मंदी सदृश्य स्थिती असून उत्पादन वाढीसाठी पतपुरवठा होणे गरजेचे आहे. यासंदर्भात बोलताना फिक्कीचे अध्यक्ष पंकज पटेल म्हणाले की, व्याजदर कमी करणे आवश्यक आहे. असे केले तर कंपन्यांना त्यांचा फायदा होऊ शकतो. 
 
यासाठी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानुसार बँकांनी व्याज दर कपातीसाठी प्रयत्न करायला हवा. भविष्यात व्याजदर वाढू नयेत यासाठी धोरण ठरवणाऱ्यांनी प्रयत्न करायला हवेत, असे औद्योगिक संघटना अॅसोचेमचे म्हणणे आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप जजोदीया म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम आयातीवर परिणाम होत असल्याने धोरणकर्त्यांनी यावर अंकुश ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मानांकन देणारी संस्था ‘आयसीआरए’च्या प्रमुख अर्थतज्ज्ञ आदिती नायर म्हणाल्या की, खाद्यपदार्थ आणि उत्पादीत मालाच्या महागाई दरात वाढ झाली असताना घाऊक किंमत निर्देशांक फेब्रुवारी महिन्यातही वाढलेला राहण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात स्थिती थोडी सुधारू शकते. घाऊक महागाई ५.२५ टक्क्यांवर पोहचली आहे. ३० महिन्यांतील हा उच्चांक आहे. 

किरकोळ महागाई दरात घट
किरकोळ महागाई दर मात्र पाच वर्षात सर्वात कमीवर आला. एका दिवसापूर्वी म्हणजेच सोमवारी किरकोळ महागाई दरात घसरण पाहायला मिळाली होती. जानेवारीमध्येही यात घट झाली होती. तो ३.१७ टक्क्यांवर आला. मागील पाच वर्षात हा दर सर्वात कमी आहे.  डिसेंबर २०१६ मध्ये महागाई दर ३.४१ टक्क्यांवर होता. नोटबंदीनंतर सतत दुसऱ्या महिन्यात किरकोळ महागाई दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. 
 
इंधन महाग झाले   
जानेवारी महिन्यात इंधनाचा महागाई दर वाढून १८.१४ टक्क्यांवर पोहोचला, तर डिसेंबरमध्ये हा आकडा ८.६५ टक्के राहिला. पेट्रोलची घाऊक महागाई १५.६६ टक्क्यांवर पोहोचली. याआधी हा आकडा ८.५२ टक्क्यांवर होता. 
बातम्या आणखी आहेत...