आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Highway Accident Victims Get Immediate Treatment

महामार्गावरील अपघातग्रस्तांना मिळणार तत्काळ उपचार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्‍ट्रीय महामार्गांवर अपघात झाल्यास जखमींना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी देशभरातील सर्व महामार्गांवर उपचार केंद्रांचे जाळे उभारण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची योजना आहे. ‘गोल्डन क्वॉड्रिलेट्रल’ नावाच्या या योजनेअंतर्गत 11 व्या योजनेतही सरकारने असा निर्णय घेतला होता.


श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत, तर सिल्चरपासून पोरबंदरपर्यंत सर्व राष्‍ट्रीय महामार्गांवर दर 100 ते 150 किलोमीटर अंतरावर एक अशी एकूण 149 ट्रॉमा सेंटर्स उभारली जाणार आहेत. यासाठी 900 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला अर्थ समितीची मंजुरी लवकरच मिळेल, अशी आशा वर्तवण्यात आली आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ही ट्रॉमा सेंटर्स उभारली जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव निकुंज धल यांनी सांगितले. देशातील सर्व महामार्गांवर उपचार केंद्रांचे जाळे उभारण्यासाठी ठिकाणेही निश्चित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गावर दर 100 ते 150 किलोमीटर अंतरावर ट्रॉमा सेंटर उभारले जाईल. ही अद्ययावत उपचार केंद्रे तीन प्रकारची असतील. एल- 1 श्रेणीच्या केंद्रात किरकोळ जखमींवर उपचार होतील, एल-2 मध्ये अधिक जखमींवर, तर एल-3 केंद्रांमध्ये गंभीर जखमींवर उपचार उपलब्ध होणार आहेत.


महामार्गावर कोठेही-कसाही अपघात झाल्यास जखमींना तीन तासांच्या आत नजीकच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचवले जाणार आहे. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्तांना जर चार तासांच्या आत योग्य उपचार मिळाले तर जीवित हानीचे प्रमाण कमी होऊ शकते. याच उद्देशाने सर्र्व महामार्गांवर दर 50 किलोमीटर अंतरावर रुग्णवाहिनी तैनात केली जाणार आहे. सर्व राज्यांच्या राजधान्यांना जोडणा-या राज्यमार्गांवरही ट्रॉमा सेंटर उभारले जाणार असल्याची माहिती या अधिका-यांनी दिली.


अपघातांत मुंबईसह महाराष्‍ट्रआघाडीवर
अपघातांच्या बाबतीत मुंबईसह महाराष्‍ट्रदेशात आघाडीवर आहे. त्याखालोखाल तामिळनाडू दुस-या क्रमांकावर, मध्य प्रदेश तिस-या, तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश चौथ्या व पाचव्या क्रमांकांवर आहेत. 2011 मध्ये देशातील महानगरांपैकी मुंबईत सर्वाधिक 25 हजारांवर अपघात नोंदवले गेले. त्याखालोखाल दिल्ली दुस-या क्रमांकावर, तर बंगळुरू, इंदूर आणि भोपाळ ही शहरे अनुक्रमे तिस-या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.


पूर्वीचे उद्दिष्ट अपूर्णच
11 व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गतही केंद्राने 116 ट्रॉमा सेंटर उभारण्याची घोषणा केली होती. यासाठी 732.75 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. मात्र, यापैकी अद्याप देशभरातील विविध महामार्गांवर फक्त 37 ट्रॉमा सेंटर्स उभारण्यात आली आहेत.


दर 3 मिनिटांनी 1 अपघाती मृत्यू
एका पाहणीनुसार देशभरात दर तीन मिनिटांनी एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतो. जगात हे प्रमाण सर्वाधिक आहे. रस्ते वाहतूक विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2011 मध्ये देशात 4.97 लाख रस्ते अपघात झाले. 2010 च्या तुलनेत अपघातांची संख्या कमी आहे. मात्र 2010 च्या तुलनेत अपघाती मृत्यंूचे प्रमाण मात्र 2011 मध्ये वाढले आहे. 2010 मध्ये पाच लाखांवर अपघात झाले होते. 2010 मध्ये 1.30 लाख नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला, तर 2011 मध्ये ही अपघाती मृत्यूंची संख्या 1.40 लाखावर गेली होती.