आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरभद्रसिंह यांच्या मुलाची सीबीआयकडून चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बेहिशेबी संपत्ती प्रकरणात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांची मंगळवारी चौकशी केली.

सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, विक्रमादित्य सिंह हे मंगळवारी सकाळी चौकशी पथकासमोर हजर झाले. त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रकरणात वीरभद्र सिंह यांची या महिन्याच्या सुरुवातीला चौकशी झाली होती. त्या वेळी पत्नी आणि मुले यांच्या मालमत्तेचे स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी त्यांचीच आहे, असे वीरभद्र सिंह यांनी सांगितल्याचा दावा सूत्रांनी केला. विक्रमादित्य सिंह यांची या महिन्याच्या सुरुवातीला सीबीआयने प्राथमिक चौकशी केली होती. त्या वेळी त्यांनी आपली काही मालमत्ता वडिलांनी दिलेल्या पैशातून खरेदी केलेली आहे, असे सांगितले होते. वीरभद्र सिंह आणि विक्रमादित्य सिंह यांच्या वक्तव्यातील फरकाबाबतच विक्रमादित्य यांना प्रश्न विचारण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.

वीरभद्र सिंह यांची ९ आणि १० जूनला चौकशी झाली होती. त्यानंतर एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, वीरभद्र सिंह यांची पत्नी आणि मुले यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेच्या प्रकरणात वीरभद्र सिंह, त्यांचे सहकारी आणि भागीदार यांच्याविरोधात भक्कम प्रकरण तयार होते.

असे आहे प्रकरण
सीबीआयने वीरभद्र सिंह यांच्या विरोधात बेहिशेबी संपत्ती प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. वीरभद्र सिंह हे २००९ ते २०१२ या काळात यूपीएच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. त्या काळात त्यांनी स्वत:च्या तसेच कुटुंबीयांच्या नावावर मालमत्ता खरेदी केली होती. ही मालमत्ता त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांशी विसंगत आहे, असे सीबीआयचे म्हणणे आहे.यासंदर्भात सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार, दिल्लीच्या विशेष न्यायालयात एफआयआर दाखल केला आहे. त्यात वीरभद्र सिंह, त्यांची पत्नी प्रतिभा, एलआयसी एजंट आनंद चौहान आणि युनिव्हर्सल अॅपल असोसिएट्स लिमिटेडचे मालक चुन्नीलाल चौहान यांना आरोपी करण्यात आले आहे. सिंह यांनी हा आरोप फेटाळला आहे.
बातम्या आणखी आहेत...