आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Mahasabha Want A Set A Statue Of Nathuram Godse At Delhi

हिंदू महासभेला दिल्लीत उभारायचाय नथुराम गोडसेचा पुतळा, मोदींच्या भूमिकेकडे लक्ष!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेला 'देशभक्त' म्हटल्यावरून संसदेत नुकताच गदारोळ ताजा असतानाच हिंदू महासभेने नथुराम गोडसेचा पुतळा तयार करून घेतला आहे. हिंदू महासभेला हा पुतळा दिल्लीत बसविण्याचा मानस असून, त्यासाठी ते केंद्र सरकारकडे परवानगी मागणार असल्याचे कळते. दरम्यान, मागील काही दिवसांत हिंदुत्त्ववादी मंडळींनी मोदी सरकारला अडचणीत आणण्याचे काम केल्यानंतर मोदी या घटनेकडे कसे पाहतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
हिंदू महासभेचे अध्यक्ष चंद्र प्रकाश कौशिक यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. आपल्या देशात सर्व महापुरुषांचे पुतळे आहेत मग गोडसेचा का नाही. गोडसेने केलेली ती हिंसा नव्हती. सर्व पर्याय संपल्याने त्याने हे पाऊल उचलले होते. त्यामुळे गोडसेचा गौरव म्हणून आम्ही पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीसह आम्ही 5 शहरांत पुतळा उभारण्याकरिता परवानगी मागणार आहोत. केंद्र सरकार यापैकी ज्या शहरात पुतळा उभारण्याला परवानगी देईल तेथे आम्ही हा बनवलेला पुतळा उभारू. सरकारने परवानगी न दिल्यास दिल्ली ऑफिससमोर हा पुतळा उभा करू असेही कौशिक यांनी म्हटले आहे.
मागील आठवड्यात नथुराम गोडसेच्या पुण्यतिथीवरून संसद दणाणली होती. गोडसेची पुण्यतिथी महाराष्ट्रात शौर्यदिवस म्हणून साजरी करण्यात आल्याचे व त्याला भाजपचे दोन आमदारही उपस्थित असल्याचे सांगत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी संसदेत गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर काँग्रेससह सर्व सेक्युलर पक्षाने सरकारला धारेवर धरले होते. त्याचवेळी भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी नथुराम गोडसे हा 'देशभक्त' असल्याचे म्हटले होते.
नथुराम गोडसेची समर्थक असलेल्या हिंदू महासभेने त्याचा पुतळा बनवून घेतला आहे. राजस्थानच्या किशनगडमध्ये हा पुतळा बनविण्यात आला आहे. तसेच गांधी यांच्या हत्येचा कट ज्या खोलीत रचला त्या खोलीतच सध्या तो पुतळा ठेवण्यात आला आहे. आता मोदी सरकार हिंदु महासभेच्या भूमिकेवर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.