आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आले स्वस्त गृहकर्जाचे दिवस, आयसीआयसीआय, डीएचएफएल, इंडिया बुल्सचे कर्ज स्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयसीआयसीआय बँकेने मंगळवारी गृहकर्जाच्या व्याजदरात ०.२५ टक्क्यांनी कपात केली आहे. याचा लाभ बँकेच्या सध्याच्या व नव्या कर्जदारांना होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सात एप्रिल रोजी पतधोरणात व्याजदर जैसे थे ठेवत बँकांना कर्ज स्वस्त करण्याबाबत खडसावले होते. त्यानंतर एसबीआय, एचडीएफसी, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक यांनी कर्जाच्या मूळ दरात कपात केली होती. आता आयसीआयसीआय बँकही त्या पंगतीत आली आहे. बँकेचे नवे व्याजदर १० एप्रिलपासून लागू आहेत.

यासंदर्भात आयसीआयसीआय बँकेने सांगितले, महिला तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आता ९.८५ टक्के व्याजदराने, तर इतक कर्जदारांना ९.९० टक्के दराने गृहकर्ज देण्यात येणार आहे. फिक्स्ड व्याजाच्या गृहकर्जाच्या व्याजदरातही कपात करण्यात आली आहे. सध्या १० वर्षे मुदतीच्या ३० लाख रुपये रकमेच्या फिक्स्ड व्याजदराच्या कर्जावर आता ९.९० टक्के दराने व्याजदर आकारणी होईल. याचप्रमाणे फ्लोटिंग प्रकारच्या गृहकर्जावर आकारणी होणार आहे.

इंडिया बुल्सचा ईएमआय ८७० रुपये प्रति लाख
खासगी क्षेत्रातील वित्तपुरवठा करणारी कंपनी इंडिया बुल्सनेही गृहकर्जाचे व्याजदर ०.२० टक्क्यांनी कमी केले आहेत. आता कंपनीचे व्याजदर ९.९० टक्के झाला आहे, नवे दर १४ एप्रिलपासून लागू झाले आहेत. ग्राहकांना आता ५० लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज लाखामागे ८७० रुपये मासिक हप्त्याने उपलब्ध असल्याचे इंडिया बुल्सने म्हटले आहे.

स्पर्धेमुळे ग्राहकाचा फायदा
राजन यांनी खडसावताच बँकांनी गृहकर्ज स्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी कर्जदाती स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदरात ०.१५ टक्के कपात करून मूळ कर्जदर ९.९० टक्क्यांवर आणला. त्यानंतर महिला कर्जदारांसाठी आणखी ०.५ टक्के कपात करत मूळ व्याजदर ९.८५ टक्क्यांवर आणला आहे. त्याचप्रमाणे आयसीआयसीआय या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने एसबीआयप्रमाणेच ९.८५ टक्के व्याजदर ठेवला आहे. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक यांनीही ०.२५ टक्क्यांच्या कपातीसह कर्ज स्वस्त केले आहे. यामुळे ग्राहकांसाठी मासिक हप्ता स्वस्त होऊन फायदा होणार आहे.

डीएचएफएलकडूनही कपात
गृहवित्त पुरवठा क्षेत्रातील डीएचएफएल कंपनीनेही गृहकर्जाचे व्याजदर ०.२५ टक्क्यांनी घटवले आहेत. कंपनीने सध्याच्या १०.१५ टक्क्यांवरून व्याजदर ९.९० टक्क्यांवर आणले आहेत. नवे व्याजदर १५ एप्रिलपासून लागू होणार आहेत.